>> उत्तर प्रदेशात तिसर्या टप्प्यात ५७.४४ टक्के मतदान
पंजाबमध्ये सर्व जागांसाठी काल रविवारी एकाच टप्प्यात मतदान झाले. तर उत्तर प्रदेशमध्ये तिसर्या टप्प्यासाठी काल मतदान झाले. पंजाबमध्ये ६३.४४% टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर उत्तर प्रदेशात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५७.४४% टक्के मतदान झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सत्ता राखण्याचे तर पंजाबमध्ये कॉंग्रेसला सत्ता राखण्याचे आव्हान कायम असणार आहे.
पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान
पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण ११७ जागा आहेत. त्या सर्वच जागांसाठी काल मतदान झाले. काल संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात ६३.४४ टक्के लोकांनी मतदान केले. २०१७ मध्ये पंजाबमध्ये कॉंग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. तर शिरोमणी अकाली दर आणि भाजप यांच्या युतीला १८ जागा आणि आम आदमी पक्षाला २० जागा मिळाल्या होत्या. तर २ जागा या लोक इन्साफ पार्टीला मिलाल्या होत्या. त्यामुळे आता यावेळी सत्ता टिकवण्याचे कॉंग्रेससमोर मोठे आव्हान असणार आहे. कॉंग्रेसला आम आदमी पार्टी, भाजप, शिरोमणी अकाली दल या पक्षांनी जोरदार टक्कर दिली आहे. याचबरोबर कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहदेखील या निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर आला आहे.
उत्तर प्रदेशध्ये ४०३ विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये मतदानाचे पहिले दोन टप्पे पार पडले आहेत. पहिल्या टप्प्यात ५८ जागांसाठी तर दुसर्या टप्प्यात ५५ जागांसाठी मतदान झाले आहे. काल ५९ जागांच्या तिसर्या टप्प्यासाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५७.४४ टक्के एवढे मतदान झाले. २०१७ मध्ये भाजपने उत्तर प्रदेशमधील या ५९ जागांपैकी ४९ जागा जिंकल्या होत्या तर समाजवादी पक्षाला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले होते. बहुजन समाज पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता.