पंचायत निवडणूक जूनमध्य होणे कठीण ः माविन गुदिन्हो

0
27

पंचायत निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असून निवडणूक जून महिन्यात होणे कठीण असल्याचे काल पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. निवडणुकांची तारीख निश्‍चित कऱण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व राज्याचे ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे गुदिन्हो यांनी काल सांगितले.

गेल्या १० मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना सरकारला पंचायत निवडणुकांत अन्य मागास वर्गीयांसाठीचे आरक्षण हे नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार करण्यात यावे असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे राज्यात होणार असलेली पंचायत निवडणूक आम्हाला अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त पुढे जाण्याची शक्यता असून ती जून महिन्यात होणे कठीण असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षणासंबंधीच्या आदेशामुळे हे आरक्षण नव्याने करावे लागणार असून त्यासाठी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील असे दिसत असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले आहे.