पंचायत कर्मचार्यांना कॉमन कॅडर लागू करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या संबंधीची ङ्गाईल कायदा खात्याकडे पाठविण्यात आली आहे. पंचायत कर्मचार्यांच्या पगारात वाढ केली जाणार आहे. पगारवाढीचा प्रस्ताव वित्त खात्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पंचायत, पशुसंवर्धन मंत्री मावीन गुदिन्हो यांनी विधानसभेत पंचायत, पशुसंवर्धन खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल दिली.
कायदा खात्याच्या मान्यतेनंतर पंचायत कर्मचार्यांना कॉमन कॅडर लागू केला जाणार आहे. पंचायत कार्यालयात कामानिमित्त येणार्या नागरिकांची पंचायत सचिव, कर्मचार्यांकडून होणार्या सतावणुकीची प्रकरणे आपल्या नजरेस आणून द्यावीत. संबंधितांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असेही गुदिन्हो यांनी सांगितले. पंचायत खात्यात ६ नवीन गटविकास अधिकारी, १० कनिष्ठ अभियंते, ८ साहाय्यक अभियंते, ४ कार्यकारी अभियंते व इतर कर्मचार्यांची भरती केली जाणार आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
पंचायतीमध्ये घरांना नोंदणी क्रमांक देताना गैरव्यवहार केला जात असल्याने बेकायदा घरे बांधण्याचे प्रमाण वाढत आहे. पंचायत कायद्यात आवश्यक दुरुस्ती करून बेकायदा घरे बांधणार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
राज्यात मोकाट गुरे, कुत्र्यांचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे. मोकाट गुरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे लक्ष दिले जात आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येणार्या स्वयंसेवी संस्थांना योग्य सहकार्य दिले जाणार आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले. दूध उत्पादन वाढीसाठी योजनांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्यातील दुधाचे उत्पादन १ लाख ६८ हजारावर पोहोचले आहे. दूध उत्पादनामध्ये साधारण ३० हजार लीटर वाढ झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.