पंचवीसहून अधिक खासदारांना कोरोना

0
102

>> कोरोनाच्या सावटाखाली संसदेेचे अधिवेशन सुरू

लोकसभेचे १७ आणि राज्यसभेचे ९ मिळून किमान २६ खासदारांना कोरोना असल्याचे काल त्यांच्या चाचण्या केल्या असता स्पष्ट झाले. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने सर्व खासदारांना तत्पूर्वी ७२ तासांमध्ये कोरोना चाचण्या करण्यास सांगण्यात आले होते. त्यामध्ये ही बाब उघडकीस आली. भाजप नेते अनंतकुमार हेगडे, मीनाक्षी लेखी, सत्यपालसिंग आदींना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप नेते हनुमान बेनिवाल हे दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह ठरले, परंतु राजस्थानात त्यांची पुन्हा चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली.

कोरोनाच्या सावटाखाली संसदेचे पावसाळी अधिवेशन काल सुरू झाले. सर्व खासदारांना अधिवेशनापूर्वी ७२ तासांमध्ये केलेल्या कोरोना चाचणीचा दाखला सक्तीचा करण्यात आला होता व सभापतींद्वारे सर्वांना खास ‘कीट’ ही पुरविण्यात आले होते. यापूर्वी सात केंद्रीय मंत्र्यांना आणि जवळजवळ दोन डझन खासदारांना कोरोना झाला असून काहीजण त्यातून बरे झाले आहेत. उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत, परंतु ते अधिवेशनात सहभागी झालेले नाहीत. लोकसभा व राज्यसभा यांच्या मिळून एकूण ७८५ खासदारांपैकी दोनशे खासदार ६५ वर्षांवरील असून कोरोनासंदर्भात त्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.