मापा, पंचवाडी येथील म्हैसाळ धरणात सावर्डे येथील विद्यालयात शिकणार्या भगतसिंग गंगासिंग दैया (वय १७) या विद्यार्थ्याचे काल बुधवारी बुडून निधन झाले. ही दुर्घटना संध्याकाळी साडेचार वाजता घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुडालेल्या विद्यार्थ्याचे कुटुंब मूळ राजस्थान येथील असून, ते व्यवसायानिमित्त सावर्डे येथे राहतात. भगतसिंग याने आपण ट्यूशन क्लासला जातो असे सांगून मित्रांसह मापा-पंचवाडी म्हैसाळ धरणाच्या ठिकाणी पोहायला आला होता. पाण्यात उतरल्यानंतर भगतसिंग गटांगळ्या खाऊ लागला असता त्याला वाचविण्याचा त्याच्यासोबत असलेल्या अन्य मित्रांनी प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. नंतर त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून इतरांना सांगताच स्थानिकांनी धरणाच्या ठिकाणी धाव घेऊन भगतसिंगला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तो वाचू शकला नाही. यावेळी अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी हजर झाले होते.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह बांबोळी इस्पितळात शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आला आहे.