भारत व न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा व महत्त्वपूर्ण सामना आज पुणे येथे खेळविला जाणार आहे. पहिला सामना जिंकून किवीज संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून आव्हान कायम राखण्यासाठी भारताला आज विजय आवश्यक आहे.
पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने आपला ‘स्पिन स्पेशलिस्ट’ फलंदाज टॉम लेथम याला मधल्या फळीत खेळवून भारताच्या हातातून विजय हिरावला होता. आजच्या सामन्यातही त्यांची हिच रणनीती असणार आहे. लेथमसमोर कुलदीप व चहल ही भारताची फिरकी द्वयी प्रभाव पाडण्यात अपयशी ठरली होती. भुवनेश्वर व बुमराह यांचे नव्या चेंडूने प्रदर्शनेदेखील लौकिकाला साजेसे नव्हते. परंतु, आजच्या सामन्यासाठी संघात बदलाची शक्यता फार कमी आहे. न्यूझीलंडसुद्धा पहिल्या सामन्यातील संघ या सामन्यातही उतरवणार आहे. पुण्याचे मैदान आकारमानाने लहान असल्याने या मैदानावर धावांचा पाऊस पडतो. मागील वेळीस भारताने या मैदानावर ३५१ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. पावसाची शक्यतादेखील नसल्याने आज पूर्ण षटकांचा खेळ होणार आहे.
भारत (संभाव्य) ः रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल व जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड (संभाव्य) ः मार्टिन गप्टिल, कॉलिन मन्रो, केन विल्यमसन, रॉस टेलर, टॉम लेथम, हेन्री निकोल्स, कॉलिन डी ग्रँडहोम, मिचेल सेंटनर, ऍडम मिल्ने, टिम साऊथी व ट्रेंट बोल्ट.