तिसर्या व शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा ५ गडी व १७ चेंडू राखून पराभव करत मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. टी-ट्वेंटी मालिकेतील व्हाईटवॉशचा वचपा किवी संघाने एकदिवसीय मालिकेतील झंझावाती कामगिरीने काढला. भारताने विजयासाठी दिलेले २९७ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने ४७.१ षटकांत ५ गडी गमावून गाठले. कॉलिन डी ग्रँडहोमने केवळ २८ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५८ धावा चोपून न्यूझीलंडच्या विजयात मोलाचे योगदान देतानाच पहिल्या दोन लढतींतील अपयश धुवून काढले.
न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. डावातील दुसर्या षटकात अगरवाल (१) व सातव्या षटकात कर्णधार विराट कोहली (९) तंबूत परतल्याने पृथ्वी शॉ व अय्यर यांना डावबांधणीचे काम करावे लागले. शॉ स्थिरावलेला असताना डी ग्रँडहोमच्या फेकीवर धावबाद झाला. श्रेयसने आपले आठवे एकदिवसीय अर्धशतक झळकावताना मालिकेत सलग तिसर्यांदा अर्धशतकी वेस ओलांडली. ९ चौकारांसह ६२ धावा करून तो परतला. लोकेश राहुलने ११२ धावांची समयोचित खेळी करत ९ चौकार व २ षटकारांसह आपले चौथे एकदिवसीय शतक साजरे केले. मनीष पांडेने ४२ धावा केल्या. न्यूझीलंडकडून हॅमिश बेनेट सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६४ धावांत ४ गडी बाद केले. जेमिसन व नीशमने प्रत्येकी १ बळी घेतला.
आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांना शतकी सलामी दिली. भारतीय गोलंदाजांना धावा रोखण्यासाठी व बळी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. गप्टील भारतीय गोलंदाजांवर तुटून पडला. केवळ ४६ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह त्याने ६६ धावा जमवल्या. सामनावीर ठरलेला दुसरा सलामीवीर हेन्री निकोल्सने एक टोक लावून धरताना १०३ चेंडूंत ८० धावा केल्या. संघात परतलेला कर्णधार केन विल्यमसन केवळ २२ धावा करू शकला. पहिल्या दोन सामन्यांत भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या रॉस टेलरलादेखील भारताने लवकर बाद केले. पण, यावेळी ग्रँडहोम संघाच्या मदतीला धावला. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी या सामन्यात २० षटकांत केवळ ९२ धावा देत ४ गडी बाद केले तर वेगवान गोलंदाजांनी २७.१ षटकांत २०५ धावांची खैरात करत केवळ १ गडी बाद केला. ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री या प्रमुख वेगवान गोलंदाजांविना न्यूझीलंडचा संघ या मालिकेत उतरला होता. पहिल्या दोन सामन्यात तर त्यांना नियमित कर्णधार केन विल्यमसन याच्या अनुपस्थितीत खेळावे लागले होते.