>> तेरेखोल नदीत बेकायदा रेती उपसा करणार्या २६ होड्या जप्त; अन्य ठिकाणी कारवाईकडे काणाडोळा
पेडण्यातील बेकायदा रेती उपशावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सोमवारी फटकारल्यानंतर संबंधित सरकारी अधिकारी खडबडून जागे झाले असून, बंदर कप्तान खात्याच्या अधिकार्यांनी काल पोरस्कडे-न्हयबाग येथील तेरेखोल नदीत बेकायदेशीरपणे रेती उपसा करणार्या २६ होड्या जाप्त केल्या.
बंदर कप्तान खात्याचे उपसंचालक श्री. शिरसईकर यांनी भरारी पथकाचे अधिकारी तथा पेडणे मामलेदार अनंत मळीक, पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक आणि अन्य पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली. या कारवाईत एकाच ठिकाणी पोरस्कडे-न्हयबाग येथे एकूण २६ होड्या जप्त करण्यात आल्या. या सर्व होड्या जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या.
किनारी भागात बेकायदा होड्या किती आहेत, कोणत्या भागात रेती उपसा केला जातो, याची केवळ पाहणी करण्यासाठी आलो होतो, असा दावा श्री. शिरसईकर यांनी केला. या ठिकाणी आम्हाला तेरेखोल नदीत सहा होड्या सापडल्या आणि नदीच्या वरच्या बाजूला २० होड्या आढळून आल्या. आम्ही एकूण २६ होड्या जप्त केल्या, असे त्यांनी सांगितले.
या २६ होड्या मालकांपैकी कुणा-कुणाकडे परवाने आहेत, कुणाकडे होड्यांची कागदपत्रे आहेत, याची तपासणी केली जाईल; परंतु ज्यावेळी आम्ही या होड्या जप्त केल्या, त्यावेळी कोणीही या होड्यांवर आपला दावा केला नाही. त्यामुळे एकूण २६ होड्या पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे अधिकारी शिरसईकर यांनी सांगितले. तसेच याहीपुढे ही कारवाई चालू राहील, असा इशारा त्यांनी दिला.
बाजूच्या अन्य होड्यांवर कारवाई नाही
या तेरेखोल नदी किनारी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जातो, त्या ठिकाणी एकही रेतीचा साठा आढळून आला नाही. तसेच इतरत्र मोठ्या प्रमाणात होड्या नदीकाठी होत्या. त्या २० मीटर लांबीच्या अंतरावर होड्या होत्या, त्या निदर्शनास येऊनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. ही कारवाई केवळ स्टंटबाजी असल्याची चर्चा या ठिकाणी नागरिकांत सुरू होती.
अधिकार्यांवर दबाव असतोच : शिरसईकर
मागच्या पाच वर्षांत तुम्ही कारवाई का केली नाही, तुमच्यावर राज्यकर्त्यांचा किंवा एखाद्या मंत्र्याचा दबाव होता का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता शिरसईकर यांनी सांगितले की, नेतेमंडळी म्हणा किंवा मंत्र्याचा हा दबाव या ना त्या कारणामुळे अधिकार्यांवर असतोच; परंतु रेती हा बांधकाम क्षेत्राचा महत्त्वाचा घटक असल्याने रेती मिळणे आवश्यक आहे. रेती काढण्यासाठी या ठिकाणी दहा होड्यांना परवानगी दिली असताना त्या ठिकाणी ५० होड्या कशा तयार झाल्या, असा प्रश्न आपल्याला पडत असल्याने आणि आपण अधूनमधून कारवाईसाठी घटनास्थळी पाहणी करतो, असे त्यांनी सांगितले.
इतरत्र कारवाईकडे दुर्लक्ष
पेडणे तालुक्यातील तेरेखोल नदीत केरी, किरणपाणी, देवसू, कोनाडी, भालखाजन, पराष्टे, उगवे, तोरसे या भागात रेती उपसा आजही मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच शापोरा नदीत इब्रामपूर, तळर्ण, थर्मास, महाखाजन, कोलवाळ, कामुर्ली, या भागातही रेती उपसा चालू असतो, त्या ठिकाणच्या बेकायदा होड्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न काही नागरिकांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
कोरगावात लपवून ठेवलेला रेती साठा जप्त
२६ होड्या जप्त करण्याच्या कारवाईला काही तास उलटत नाहीच तोच पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी देवसू-कोरगाव येथे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे लपवून ठेवले होते, ते शोधून काढत हा रेतीसाठा जप्त करण्याची कारवाई केली. पेडणे पोलिसानी संबंधितांवर भारतीय दंड संहिता कलम ३७९ आणि ३३८ गोवा दमण दीव माईन अँड मिनरल कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.
…म्हणून केली कारवाई
उच्च न्यायालयाने पोलीस अधिकारी, पेडण्याचे मामलेदार, जिल्हाधिकारी, खाण आणि भूगर्भ खाते, बंदर कप्तान खात्याच्या अधिकार्यांवर बेकायदा रेती उपशावर कारवाई न केल्याबद्दल सोमवारच्या सुनावणीवेळी ताशेरे ओढले होते. त्यामुळेच ही कारवाई केल्याचे दिसून आले.