न्यायमूर्ती संजीव खन्ना भारताचे नवे सरन्यायाधीश शक्य

0
1

>> विद्यमान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याकडून केंद्र सरकारकडे शिफारस; मंजुरी मिळाल्यास 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार

भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचा कालावधी 10 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे भारताचे 51 वे सरन्यायाधीश कोण असतील? याबाबत आता उत्सुकता आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कायदा मंत्रालयाला पत्र लिहून सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायाधीश संजीव खन्ना यांची 51 व्या सरन्यायाधीशपदी निवड करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे. चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांच्या काळात त्यांनी काही ऐतिहासिक आणि महत्त्वाचे निकाल घेतले आहेत. चंद्रचूड पदावरून पायउतार होताच, संजीव खन्ना हे कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने मंजूरी दिल्यास न्या. संजीव खन्ना हे पुढील सहा महिन्यांसाठी सरन्यायाधीश पदावर राहू शकतात. कारण ते 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नियुक्ती ज्येष्ठताक्रमाने केली जाते. सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे प्रमुख असतात. ते सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि देशातील विविध उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीची शिफारस करत असतात. धनंजय चंद्रचूड हे 2 वर्ष त्यांच्या पदावर राहिल्यानंतर 10 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत. निवृत्तीपूर्वी त्यांनी न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे.

न्या. संजीव खन्ना 11 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. पुढील सहा महिन्यानंतर म्हणजेच 13 मे 2025 रोजी ते निवृत्त होणार आहेत. जानेवारी 2019 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून रुजू झाले होते. सध्या त्यांच्यासमोर कंपनी कायदा, मध्यस्थता, सेवा कायदा, सागरी कायदा, नागरी कायदा आणि वाणिज्यिक विषयक कायदा यासंदर्भातील प्रकरण आहेत.

संजीव खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला असून सुमारे चार दशकाहून अधिक काळ ते न्यायिक क्षेत्रात काम करत आहेत. 1983 साली दिल्ली बार कौन्सिलचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालय, तीस हजारी कोर्ट, दिल्ली उच्च न्यायालय आणि विविध लवादांमध्ये वकिली केली. घटनात्मक कायदा, कर आकारणी, विविध लवाद, व्यावसायिक कायदे, कंपनी कायदे आणि पर्यावरण कायदे यासारख्या कायद्याच्या अनेक क्षेत्रात त्यांनी यशस्वीरित्या वकिली केली.
संजीव खन्ना यांनी प्राप्तिकर विभागासाठी वरिष्ठ वकील म्हणून काम केले आणि 2004 मध्ये दिल्लीच्या एनसीटी (सिव्हिल) विभागासाठीही वकिली केली. दिल्ली उच्च न्यायालयात काही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये त्यांनी अतिरिक्त सरकारी वकील म्हणूनही भूमिका बजावली.

2005 साली त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर ते 2006 साली न्यायमूर्ती म्हणून कायम झाले. 18 जानेवारी 2019 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड झाली. न्या. संजीव खन्ना हे सध्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. तसेच राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आहेत. जून ते डिसेंबर 2023 या काळात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्षपदही भूषविले होते.