न्यायदेवतेच्या पुतळ्यात मोठा बदल

0
7

>> डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान; उजव्या हाती तराजू कायम

भारतातील न्यायव्यवस्थेसाठी प्रतिकात्मक असलेल्या न्यायदेवतेच्या (लेडी ऑफ जस्टीस) पुतळ्याच्या स्वरूपात आता मोठा बदल करण्यात आला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील असणारी काळी पट्टी आता हटवण्यात आली आहे. तसेच आधी ज्या हाती तलवार होती, त्या हाती भारताचे संविधान दिसत आहे. न्यायाधीशांच्या ग्रंथालयात हा नवीन स्वरूपाचा पुतळा बसवण्यात आला आहे. ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून या पुतळ्याकडे पाहिले जात आहे.

प्रतिकात्मक दृष्टीने पाहिले तर काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेली न्यायदेवतेचा नवीन पुतळा हा ङ्गन्याय आंधळा नसतोफ, असा स्पष्ट संदेश देत असून, तो संविधानाच्या आधारे काम करतो, असे दर्शवत आहे.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने हा पुतळा बसवण्यात आल्याचे सांगितले जात आहे; मात्र असे आणखी पुतळे बसवणार की नाही हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही.

न्यायदेवतेच्या नव्या
पुतळ्यात विशेष काय?
न्यायदेवतेच्या संपूर्ण पुतळ्याचा रंग पांढरा आहे. पुतळ्यामध्ये न्यायदेवतेचे भारतीय पोशाखात रचना करण्यात आली आहे. डोक्यावर एक सुंदर मुकुट देखील आहे. कपाळावर बिंदी, कानात, गळ्यात पारंपरिक दागिने आहेत. याशिवाय जुन्या पुतळ्याप्रमाणे न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आहे. दुसऱ्या हातात तलवारीऐवजी संविधान धरलेले दाखवले आहे.

खरे तर न्यायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या न्यायालयांमध्ये ठेवलेल्या पुतळ्याला ‘लेडी ऑफ जस्टिस’ म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी होती, आता ती हटवण्यात आली आहे.
देशातील कायदा आंधळा नाही आणि तो शिक्षेचे प्रतीक नाही, असा संदेश देणे हा नव्या पुतळ्याचा उद्देश आहे. जुन्या मूर्तीवरील डोळ्यावर पट्टी कायद्याच्या नजरेत सर्व समान असल्याचे दर्शवत होती, तर तलवार हे अधिकाराचे आणि अन्यायाला शिक्षा देण्याच्या सामर्थ्याचे प्रतीक होते. तलवारीच्या जागी आता संविधान आले आहे, असा महत्त्वाचा बदल झाला आहे.

मात्र, मूर्तीच्या उजव्या हातात तराजू कायम ठेवण्यात आला आहे, कारण ते समाजातील संतुलनाचे प्रतीक आहे. न्यायालय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी दोन्ही बाजूंचे तथ्य, युक्तिवाद पाहते आणि ऐकते, असेही त्यातून अभिप्रेत आहे.