
वास्को (न. प्र.)
नोफ्रा, दाबोळी येथे नौदल अधिकार्यांसाठी उभारण्यात आलेल्या निवासी प्रकल्पाचे उद्घाटन पश्चिम विभागाचे ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल गिरीष लुथ्रा यांच्या हस्ते करण्यात आले. विवाहितांसाठी असलेल्या आवास योजनेअंतर्गत १०० सदनिकांचा हा प्रकल्प आहे. डिसेंबर २००९ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. परंतु काही तांत्रिक समस्यांमुळे दिलेल्या वेळेत हे काम पूर्ण होऊ शकले नाही. नोफ्रा दाबोळी येथे पाच बहुमजली इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारती नागरिकांचे आयुष्य वाचविण्यासाठी आपले बलिदान दिलेल्या भारतीय नौदलाच्या शहीदांच्या स्मरणार्थ आहेत.
या प्रकल्पाच्या नामफलकाचे अनावरण कमांडर इन चीफ व्हाईस ऍडमिरल लुथ्रा यांच्या हस्ते करण्यात आले. नौदल अधिकार्यांच्या जोडप्यांना सदनिकांच्या चाव्या पश्चिम विभागाच्या नौदल व्हाईव्हरा वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्ष प्रिती लुथ्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.