नौदलाच्या गणवेशावर आता शिवरायांची राजमुद्रा

0
17

>> मालवणमधील नौदल दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा; नौदलातील पदांना भारतीय संस्कृतीनुसार नावे

ज्याचे समुद्रावर वर्चस्व तो सर्वशक्तीमान हे सर्वात पहिल्यांदा ओळखले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल काढले. भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावर आणि बोधचिन्हावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छाप आहेच. आता नौदलातील पदांना (रँक) भारतीय संस्कृतीनुसार नावे दिली जातील आणि नौदल अधिकाऱ्यांच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.

भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यालगतच्या राजकोट किल्ल्यावर काल एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधानांनी शिवरायांवर आधारित कला दालनाची देखील पाहणी केली. त्यानंतर त्यांचा ताफा नौदल दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमासाठी तारकर्लीत दाखल झाला. तारकर्ली किनाऱ्यावर चित्तथरारक कसरतींची त्यांनी पाहणी केली.

मालवण आणि तारकर्लीचा हा सुंदर समुद्र किनारा, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण आणि इथले आल्हाददायक वातावरण हे भारतात नवा जोश निर्माण करत आहे. झुकू नका, थांबू नका, पुढे चाला हा मंत्र नौदलाने दिला आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांना नौदल दिवसाच्या आपण शुभेच्छा देतो, असे म्हणत पंतप्रधानांनी भाषणाला सुरुवात केली.

यंदाचा नौदल दिन हा सिंधुदुर्गमध्ये साजरा होतो आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एखाद्या देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचे असते, ते शिवाजी महाराजांनी जाणले. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर, कान्होजी आंग्रे यांच्यासारखी लोक उभी केली. सिंधुदुर्गचा ऐतिहासिक किल्ला हे शिवाजी महाराजांच्या शक्तीचे प्रतीक आहे, असे मोदी म्हणाले.

सशस्त्र दलात महिलांची संख्या वाढवणार
आज भारत स्वत:साठी मोठी उद्दिष्टे ठरवत आहे आणि ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपली पूर्ण क्षमता वापरत आहे. आम्ही सशस्त्र दलांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यावर भर देत आहोत. त्यसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.