नौदलाचे विमान समुद्रात कोसळले

0
15

>> सुदैवाने वैमानिक बचावला; उपचारानंतर प्रकृती स्थिर

नौदलाचे मिग-२९ के लढाऊ विमान नियमित उड्डाणानंतर तळावर परतत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने काल सकाळी समुद्रात कोसळले. अपघातापूर्वी वैमानिक सुरक्षित बाहेर पडल्याने तो बचावला. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, काल सकाळी भारतीय नौदलाच्या मिग-२९ के या प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार्‍या लढाऊ विमानाने नियमित उड्डाण केले. त्यानंतर दाबोळीवरील आयएनएस हंसा तळावर परतत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमान अरबी समुद्रात कोसळले. विमानात काही अडथळे निर्माण झाल्यानंतर वैमानिकाने एअर ट्रैफिक कंट्रोलर (एटीसी) ला समस्या कळवली असता, वैमानिकाला वाचविण्यासाठी गोव्यातील नौदल तळावरून ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर पाठवण्यात आले.

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात येताच वैमानिकाने इजेक्ट बटन दाबून विमानातून बाहेर उडी घेतली. पॅराशुट उघडल्यानंतर तो वैमानिक समुद्रात स्थिरावला. त्यानंतर बचावकार्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरद्वारे वैमानिकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्याला आयएनएस हंसा गोमन्तक येथे नौदलाच्या जीवंतिका इस्पितळात दाखल करण्यात आले. वैमानिकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली.

यापूर्वीही ‘मिग-२९ के’ला अपघात

२०२० मध्ये मिग-२९ के अरबी समुद्रात कोसळल्याने निशांत सिंग या वैमानिकाचा मृत्यू झाला होता. तसेच २३ फेब्रुवारी २०२० देखील मिग-२९ के विमान कोसळले होते. २०१८ मध्येही मिग-२९ के हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. १७ नोव्हेंबर २०१९ रोजी याच प्रकारातील विमान वेर्णाजवळ कोसळले होते. त्यावेळी कॅप्टन एम. शिखंड व लेफ्ट कमांडर दीपक यादव हे बचावले होते. त्यामुळे मिग २९ के विमानांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.