नोबेल मानकर्‍याला आमदारही ओळखेनात!

0
89

मध्य प्रदेशातील विदिशात जन्मलेल्या कैलाश सत्यार्थी यांना नुकतेच नोबेलसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असले तरी त्यांच्याच राज्यातील आमदार मंडळींना मात्र त्याचा थांगपत्ताही नसल्याचे आढळून आले आहे. अनेक आमदारांनी कैलाश सत्यार्थींचे अभिनंदन करण्याऐवजी आपले नेते कैलाश विजयवर्गीय यांचे ‘नोबेल’ मिळाल्याबद्दल अभिनंदन केले!सत्यार्थी व मलाला युसूफझाई यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असूनही मध्य प्रदेशच्या काही आमदारांना मात्र त्याचा काहीही पत्ता नव्हता नसल्याचे स्पष्ट झाले. राज्याच्या पशुसंवर्धन व अन्न प्रक्रिया मंत्री कुसुम मेहदेले यांना कैलाशजींच्या नोेबेल सन्मानाबद्दल प्रतिक्रिया विचारली असता ‘कैलाश’ म्हणजे कैलाश विजयवर्गीय असे समजून ‘‘सभागृह तसेच राज्याचा हा सन्मान आहे’’ अशी अजब प्रतिक्रिया त्यांनी दिली.
वनवासी कल्याण मंत्री ग्यानसिंग यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनीही ‘‘कैलाशजी आमच्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत, त्यामुळे तो आमचाही सन्मान आहे’’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार रणजितसिंग गुणवान यांनीही कैलाश विजयवर्गीय यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना ‘‘कैलाशजी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप कष्ट करतात’’ असे उद्गार काढले. आणखी एक आमदार दिलीपसिंग परिहार यांनीही विजयवर्गीय यांच्याविषयीच कौतुकोद्गार काढणारी प्रतिक्रिया दिली.
नोबेल पुरस्कार मिळवणारे कैलाश सत्यार्थी हे वेगळे आहेत व त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही हे या आमदारांच्या गावीही नसल्याचे दिसून आले. या सर्व प्रकाराची कल्पना आलेल्या विजयवर्गीय यांनी राजकीय वर्तुळात सत्यार्थींपेक्षा आपण अधिक लोकप्रिय असल्यानेच अशा प्रतिक्रिया उमटल्याचे सांगितले.