पैसे घेऊन सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवणाऱ्या भामट्यांपासून लोकांनी सावध रहावे आणि कुणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले.
सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून फोंड्यातील दोघा नागरिकांना 14 लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या पूजा नाईक हिला अशाच प्रकारे सरकारी नोकरीचे अमिष दाखवून लोकांना गंडा घालण्याच्या प्रकरणात यापूर्वी चार वेळा अटक करण्यात आली होती, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काल दिली. पूजा नाईक हिच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असून, या गुन्ह्यात तिच्याबरोबर सामील असलेल्या सहआरोपींच्या मुसक्याही आवळल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपल्या सूचनेनुसारच पूजा हिला पहिल्यांदा अटक झाली होती, असेही त्यांनी नमूद केले.
विविध खात्यांतील सरकारी पदे ही पारदर्शक पध्दतीने भरण्यात येत असतात आणि पैसे घेऊन सरकारी नोकऱ्या दिल्या जात नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कुणीही नोकरी मिळणार ह्या आशेने अशा भामट्यांना पैसे देऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले.