काढून टाकण्याच्या हालचाली असल्याचा आरोप
गोवा नोकरभरती व रोजगार सोसायटीतर्फे विविध सरकारी खात्यात कंत्राटी पद्धतीवर भरती करण्यात आलेल्या कर्मचार्यांना कामावरून कमी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल गोवा कामगार महासंघातर्फे शहरातून मोर्चा काढण्यात आला.महासंघाचे अध्यक्ष ऍड. अजितसिंह राणे यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा नंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानावर नेला जात असताना येथील चर्च स्न्वेअर जवळ पोलिसांनी मोर्चा अडवला. नंतर अजितसिंह राणे, महासंघाचे सरचिटणीस महेंद्र वाघुर्मेकर, संयुक्त सचिव शाबी पेडणेकर, उपाध्यक्ष जाधव यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन मागण्याचे एक निवेदन मुख्यमंत्री नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सुपूर्द केले. गोवा मानव संसाधन विकास महामंडळातर्फे नव्याने कामगार भरती करून सध्याच्या कंत्राटी कामगारांना सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय मागे घ्यावा व भरतीसाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात मागे घेण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
गोवा नोकरभरती व रोजगार सोसायटीतर्फे भरती करण्यात आलेल्या कामगारांच्या मानव अधिकारांचे उल्लंघन केले जाऊ नये, या कंत्राटी कामगारांना अन्य कोणतेही काम अथवा व्यवसाय करता येणार नाही अशी जी अन्यायकारक अट घालण्यात आलेली आहे ती मागे घेण्यात यावी. नैसर्गिक न्यायाशिवाय कुठल्याही कामगाराला बळजबरीने कामावरून काढून टाकले जाऊ नये, सर्व कामगारांना सेवेत कायम केले जावे, गोवा मानव संसाधन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आल्यानंतर गोवा नोकरभरती व रोजगार सोसायटीतील कामगारांना गोवा मानव संसाधन विकास महामंडळातर्फे करण्यात येणार्या भरतीत प्रथम स्थान देण्यात यावे, त्यांच्या वेतनात वाढ केली जावी, त्यांना वेळेवर वेतन देण्यात यावे, त्यांना टीए, डीए, बोनस, रात्रपाळीचे भत्ते आदी दिले जावेत. सरकारी खाती, महामंडळे आदीत कंत्राटी पद्धतीने भरती केली जाऊ नये, कामगार संघटना स्थापन करण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेतला जाऊ नये, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यवस्थापन व त्यांच्या कामगार संघटनेची संयुक्त बैठक घेण्यात यावी अशा विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. कालच्या मोर्चात सुमारे १५०० कामगार सहभागी झाले होते. क्रांती सर्कल येथून सकाळी ९.३० वा. मोर्चा सुरू झाला. यावेळी अजितसिंह राणे, स्वाती केरकर, शाबी पेडणेकर आदींची क्रांती मैदानावर भाषणे झाली.