नोकर भरती घोटाळ्यात मंत्र्यासह अभियंता व आयएएस अधिकारी

0
7

संशयित पूजा नाईक हिचा आरोप

राज्यात गतवर्षी उघडकीस आलेल्या सरकारी नोकर भरती घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी पूजा नाईक हिने या घोटाळा प्रकरणामध्ये एक मंत्री, आयएएस अधिकारी आणि एक बांधकाम खात्याचा अभियंता गुंतल्याचा आरोप काल एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना काल केला.
सरकारी नोकरी देण्यासाठी घेण्यात आलेले 17 कोटी रुपये येत्या 24 तासांच्या आत परत न केल्यास या घोटाळा प्रकरणातील त्या तिघांची नावे जाहीर करण्याचा इशारा पूजा नाईक हिने दिला.

आपण 600 हून अधिक नोकऱ्यांसाठी इच्छुकांच्यावतीने आयएएस अधिकारी आणि पीडब्ल्यूडी अभियंत्यांना 17 कोटी रुपये रोख दिले आहेत. नोकरीच्या अर्जांसह हे पैसे पर्वरीतील त्यांच्या कार्यालयात आणि सचिवालयातही देण्यात आले होते. एकाही अर्जदाराला नोकरी देण्यात आली नाही, असेही तिने सांगितले. प्रत्येक अर्जासाठी तिला कमिशन मिळत होते. मुख्य प्राप्तकर्त्यांनी माझे पैसे परत करण्यास नकार दिल्याने आपण अर्जदारांना शक्य तितक्या मार्गाने परतफेड करत आहे. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही. आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर पुरावे सादर केल्यानंतर मुख्य आरोपींची नावे उघड करणार असल्याचा इशारा पूजा नाईकने दिला.