सरकार खरोखरच नोकर भरतीचे काम हाती घेऊन पाच हजार पदे भरणार आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते सरकारने केलेले एक राजकीय वक्तव्य आहे, हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी काल मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकारांना पाठवलेल्या एका व्हिडिओद्वारे केली आहे.
विविध सरकारी खात्यांत कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या काही कर्मचार्यांना दोन-दोन तीन-तीन महिने पगार मिळत नाही. सरकारची छोटी-मोठी कामे केलेल्या कंत्राटदारांना त्यांचे पैसे मिळत नाहीत. ‘गृह आधार’, ‘लाडली लक्ष्मी’ आदी योजनांचा लाभधारकांना पैसे मिळालेले नाहीत, सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटी पद्धतीवर काही महिन्यांपूर्वी नोकरी देण्यात आलेल्या ११५० कर्मचार्यांना सहा महिन्यांचा पगार एकाचवेळी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांना एकाच महिन्याचा पगार देण्यात आला असल्याचे ढवळीकर यांनी म्हटले आहे.