दोघांविरुद्ध मिळून 14 लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारी नोंद; फोंडा पोलिसांकडून दीपश्रीच्या मालमत्तेची तपासणी सुरू
गेले जवळपास आठ-दहा दिवस सरकारी नोकरी घोटाळा प्रकरण थंड पडले असतानाच, काल या घोटाळ्या प्रकरणी नव्या तक्रारी दाखल झाल्या. तसेच दोन वेगवेगळ्या प्रकरणात दीपश्री सावंत आणि उमा पाटील या सराईत घोटाळेबाज महिलांना अनुक्रमे फोंडा व कोलवाळ पोलिसांनी अटक केली. दीपश्री सावंतविरुद्ध सरकारी नोकरीच्या आमिषाने 10 लाखांच्या फसवणूक प्रकरणी नवी तक्रार दाखल झाली आहे, तर उमा पाटीलविरुद्ध काही दिवसांपूर्वी 4 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर काल कोलवाळ पोलिसांनी तिला अटक केली.
गेला महिनाभर सरकारी नोकरी घोटाळ्याच्या वेगवेगळ्या प्रकरणांमुळे राज्य हादरले होते. त्यानंतरच्या गेल्या आठ-दहा दिवसांत नवे एकही प्रकरण समोर आले नव्हते. त्यामुळे हे प्रकरण थंडबस्त्यात पडल्याचे चित्र होते. आता ह्या घोटाळ्याप्रकरणी नव्या तक्रारी आणि अटकेचे सत्र सुरू झाल्याने तो चर्चेत आला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंत्याची नोकरी देण्याच्या बदल्यात आणखी एकाची 10 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी फोंडा पोलिसांनी दीपश्री सावंत हिला अटक केली असून, न्यायालयाने तिला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
फोंडा पोलिसांनी दीपश्रीच्या मालमत्तेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी दिल्ली येथील फायनान्स इन्व्हेस्टमेंट युनिटकडे पत्र व्यवहार केला आहे. तसेच खरेदी केलेल्या फ्लॅटसंबधी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.फोंडा परिसरातील अनेकांना सरकारी नोकरी फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी दीपाश्री हिला दुसऱ्यांदा अटक केली आहे. दीपश्रीने 47 लाख रुपये खर्च करून माशेल येथे एका इमारतीत फ्लॅट खरेदी केला आहे. मात्र अजून कागदपत्रे तयार केली नसल्याचे बँकेतून झालेल्या व्यवहारातून उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी इमारतीच्या मालकाला नोटीस बजावली आहे; पण इमारतीच्या मालकाने अजून पर्यंत पोलिसांना सहकार्य केलेले नाही. त्यामुळे इमारतीच्या मालकाला अटक होण्याची शक्यता वाढली आहे. निरीक्षक विजयनाथ कवळेकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
दोघा महिलांची 14.50 लाखांची फसवणूक
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने आपली 14.50 लाखांची फसवणूक केली आहे, अशी तक्रार घेऊन दोन महिला काल मडगाव पोलीस स्थानकात आल्या होत्या. यावेळी पोलिसांनी त्यांना जेथे प्रत्यक्षात घटना घडली, त्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही तक्रार नोंदवा, अशी सूचना त्यांना केली. सदर दाम्पत्याने पैसे फेडण्यासाठी धनादेश दिला होता; मात्र तो वठलाच नाही, असेही त्या दोन्ही महिलांनी सांगितले. दरम्यान, ज्याने धनादेश दिला होता, तो इसम आता मृत पावला असून, त्याची पत्नी आता पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचेही दोन्ही महिलांनी सांगितले.
उमाला 5 दिवसांची पोलीस कोठडी
>> रेवोड्यातील महिलेची 4 लाख रुपयांची फसवणूक
रेवोडा-नादोडा येथील महिलेच्या पतीला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 4 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी उमा पाटील (रा. वास्को) हिला काल अटक केली. तिला 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दिला आहे.
संशयित आरोपी उमा पाटील हिच्या विरोधात पहिल्यांदा वास्को पोलीस स्थानकात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणी 2 गुन्हे दाखल झाल्यानंतर रेवोडा नादोडा येथील महिलेने कोलवाळ पोलिसांत तिच्याविरुद्ध 15 नोव्हेंबरला तक्रार नोंदवली होती. सदर महिलेच्या तक्रारीनुसार, आपल्या पतीला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 4 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार तिने दाखल केली होती. या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी उमा पाटील हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काल कोलवाळ पोलिसांनी तिला या प्रकरणात अटक केली. तिला न्यायालयात हजर करून तिची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी वास्को पोलिसांनी उमा पाटीलविरुद्ध कारवाई करताना तिच्या दोन बसगाड्या, दोन कार व एक दुचाकी जप्त केली होती. पोलीस तिच्या अन्य मालमत्तांचाही शोध घेत आहेत.