नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

0
16

>> महिलेकडून अनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा

रेल्वे खात्यात तसेच इतर ठिकाणी नोकरी देण्याचे आमिष दाखवून डिचोलीतील तसेच विविध भागातील अनेक तरुणांना एका महिलेने लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना उघड झाली आहे. सदर महिलेविरुद्ध डिचोली परिसरात तक्रार नोंदवण्यात आली असून सदर महिला डिचोलीतून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका पोलीस हवालदाराचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून या प्रकरणात अनेकांचे लाखो रुपये बुडाल्याची भीती आहे.
या प्रकरणी काही दिवसांपूर्वी डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काल अनेकांनी डिचोली पोलीस ठाण्यात विरोधात वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

आमदारांकडून दखल
सदर प्रकरणाची आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी माहिती मिळताच त्यांनी काल बुधवारी डिचोली पोलीस ठाण्यात तातडीने धाव घेतली. यावेळी त्यांनी उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांना फोनवरून संपर्क साधून या प्रकरणात दोषी असलेल्यांना त्वरित अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी डिचोली पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीत संशयित महिला डिचोली येथे एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत असल्याचे नमूद केले आहे. सदर महिलेने सन 2023 साली आपल्या कोल्हापूर येथील 2 जागा रेल्वे रुळासाठी जाणार असल्याने त्यांना पाच नोकऱ्या मिळणार असल्याचे सांगून तुम्हाला सर्व पाचही नोकऱ्या देऊ असे सांगून प्रत्येक नोकरीसाठी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार जुलै 23 मध्ये सदर महिलेला दहा लाख रुपये दिले. तसेच कर्नाटक व पुणे येथील दोघांनी तिला पाच लाख रुपये दिले. त्यानंतर काही दिवसांनी नोकरीसाठी कागदपत्रे तयार झाल्याचे सांगून उर्वरित रक्कमही तिने मागून घेतली. त्यातील काही रक्कम आपला भाऊ असलेल्या एका पोलीस हवालदाराच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्यानुसार त्याच्या खात्यावर पैसे जमा केले. पूर्ण पैसे दिल्यानंतर काही दिवसांनी एका व्यक्तीने येऊन निवडणुकीमुळे नोकरभरतीला विलंब होत असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर या प्रकरणी कसलीच हालचाल झाली नसल्याने संशय आला व तक्रार दखल केल्याचे सांगण्यात आले.