>> मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा नेण्याचा प्रयत्न
विविध सरकारी खात्यांतील नोकरभरतीत मोठा घोटाळा झालेला आहे. त्यामुळे सर्व खात्यांतील नोकरभरती रद्द करावी, या मागणीसाठी काल कॉंग्रेसने पणजीत मोर्चा काढला. हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी नेण्याचा प्रयत्न केला; मात्र मोर्चेकर्यांना पोलिसांनी चर्च स्न्वेअरजवळ अडवले. त्यावेळी मोर्चेकरी व पोलीस यांच्यात बरीच झटापट झाली.
या मोर्चात प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरती ज्या प्रकारे स्थगित ठेवून त्याची चौकशी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे अन्य खात्यातील नोकरभरती सुद्धा स्थगित करावी त्याचीही चौकशी केली जावी, अशी मागणी मोर्चेकर्यांनी यावेळी केली.
ज्या सरकारी खात्यांत नोकरभरती प्रक्रिया सुरू आहे, त्या सर्व खात्यांना ही प्रक्रिया बंद करण्यासाठीचे निवेदन कॉंग्रेसने दिले आहे. या सर्व खात्यांविरूद्ध दक्षता खात्याकडे मंगळवारी तक्रार दाखल केली जाणार असल्याचे दिगंबर कामत यांनी सांगितले.