नोकरभरती बंद केल्याच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सरकारवर टीका करणार्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपण मुख्यमंत्रीपदी असताना २०१६ साली नोकरभरती का बंद केली होती, असा प्रश्न काल सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल केला. पार्सेकर यांनी ही नोकरभरती बंद केल्यानेच ते स्वत: मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचा दावाही ढवळीकर यांनी केला.
पार्सेकरांनी निवडणुका तोंडावर असताना नोकरभरती रद्द केल्याने भाजपच्या कित्येक आमदार, मंत्र्यांचा पराभव झाला. मगोचे नेते लवू मामलेदार हेही त्याचमुळे पराभूत झाले. ही नोकरभरती रद्द करण्यात आली नसती तर मागच्या निवडणुकीत मगो व भाजपला मिळून किमान २७ जागा मिळाल्या असत्या असा दावाही ढवळीकर यांनी केला. पार्सेकर यांनी नोकरभरती रद्द करण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे भाजपला मोठा फटका बसला. दयानंद मांद्रेकर, सुभाष फळदेसाई आदी नेत्यांचाही पराभव या कारणामुळे झाल्याचा दावा ढवळीकर यांनी केला.
महिनाभरात टॅक्सींना
डिजिटल मीटर्स
राज्यातील टॅक्सींना डिजिटल मीटर्स बसवण्याचे काम महिनाभरात सुरू करण्यात येणार असल्याचे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल स्पष्ट केले. राज्यातील टॅक्सींना डिजिटल मीटर्स बसवण्याच्या कामासंबंधीचा आदेश येत्या बुधवारपर्यंत (आज) जारी करण्याचे निर्देश परवा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर काल वाहतूक मंत्र्यानी वरील स्पष्टीकरण केले. टॅक्सींवर डिजिटल मीटर बसवण्यासाठी सरकारला थोडा अवधी हवा आहे. मीटर बसवण्याचे काम कोणत्याही परिस्थितीत महिनाभरात सुरू करण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.