दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी गोमंतकीयांच्या जन्माची नोंदणी पोर्तुगालमध्ये झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपाय काढण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरू केले असून गृहमंत्रालयाचे अतिरिक्त सचिव बी. के. प्रसाद या विषयावर अभ्यास करण्यासाठी लवकरच गोवा भेटीवर येणार आहेत, अशी माहिती सावईकर यांनी काल दिली.
या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ते गोव्यात येऊन येथील वकील, शिक्षण क्षेत्रातील मंडळी तसेच अन्य संबंधितांच्या भेटी घेतील. गोमंतकियांच्या जन्माची नोंदणी पोर्तुगालमध्ये झालेली असल्याने त्याचे कोणते परिणाम होऊ शकेल, या दृष्टीकोनातून प्रसाद अभ्यास करीत आहेत. त्यांचा अहवाल तयार झाल्यानंतरच गृहमंत्रालय योग्य तो तोडगा काढून गोमंतकियांना दिलासा देणे शक्य होईल, असे सावईकर यांचे म्हणणे आहे. या विषयाचा आपण गांभिर्याने पाठपुरावा करीत असल्याचे खासदार सावईकर म्हणाले.