इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गुरुवारी येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेड विरुद्ध हैदराबाद एफसी अशी लढत होत आहे. तळातील या दोन संघांमध्ये हैदराबादला नामुष्की टाळण्यासाठी विजयाची गरज आहे.
दोन्ही संघांसाठी मोसम निराशाजनक ठरला. त्यांना थोडीफार प्रतिष्ठा कमावण्यासाठी खेळावे लागेल. नॉर्थईस्टचा शेवटून दुसरा म्हणजे नववा क्रमांक आहे. त्यांनी १६ सामन्यांत १३ गुण मिळविले आहेत. जिंकल्यास ते जमशेदपूर एफसी आणि केरला ब्लास्टर्स एफसी यांना हरवून सातवे स्थान गाठू शकतात. त्यासाठी इतर निकाल त्यांच्या बाजूने लागावे लागतील. यानंतरही मोसम त्यांच्यासाठी धक्कादायकच ठरलेला असेल.
नॉर्थईस्टसाठी प्रमुख खेळाडूंच्या दुखापती अपयशाचे मुख्य कारण ठरले. असामोह ग्यान जायबंदी झाल्यामुळे त्यांंच्या आघाडी फळीला धक्का बसला आणि गोलांचे प्रमाण घटले. त्याला पर्याय म्हणून आयर्लंडचा स्ट्रायकर अँडी किऑघ याला पाचारण करण्यात आले, पण त्याला चांगल्या कामगिरीसाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही. नॉर्थईस्टचा हा मोसमातील शेवटून दुसरा सामना आहे. त्यांचे हंगामी प्रशिक्षक्षक खलीद जमील यांच्यासमोर आणखी समस्या आहेत. ज्योस लेयूदो, वेन वाझ, रेडीम ट्लांग हे तिघे निलंबित, तर मिस्लाव कोमोर्स्की, निखिल कदम आणि प्रोवात लाक्रा जायबंदी आहेत.
नॉर्थईस्टला याआधीचा विजय हैदराबादविरुद्धच मिळाला होता. आता तळातील प्रतिस्पर्ध्याविरुद्ध फेडेरीको गॅलेगो आणि सहकारी अपयशी मालिका संपुष्टात आणतील अशी त्यांना आशा असेल.
हैदराबादने १७ सामन्यांतून केवळ सात गुण मिळविले आहेत. जिंकून मोसमाची विजयी सांगता करण्यासह आयएसएल इतिहासातील सर्वाधिक निचांकी कामगिरीचा नामुष्की टाळण्याची जेव्हीयर लोपेझ आणि त्यांच्या संघाला आशा असेल.गत वर्षी चेन्नईयीन एफसीला केवळ नऊ गुण मिळाले होते. सध्या हा निचांक त्यांच्या नावावर आहे. आता नॉर्थईस्टला हरविता आले नाही तर ही नामुष्की हैदराबादवर ओढवेल. पूर्ण मोसमात हैदराबादला आतापर्यंत एकच सामना जिंकता आला आहे. एकाही सामन्यात त्यांना क्लीन शीट राखता आलेली नाही. आता मोहीमेविषयी थोडा तरी आदर निर्माण करण्याची त्यांना अखेरची संधी आहे. केंद्रीय बचावपटू मॅथ्यू किल्गॅलॉन आणि नियमित गोलरक्षक कमलीजत सिंग यांच्या अनुपस्थितीत त्यांना हे करावे लागेल.