नॉर्थईस्टची पिछाडीवरून ब्लास्टर्सविरुद्ध बरोबरी

0
245

घानाचा स्ट्रायकर क्वेसी अप्पीया आणि गिनीच्या इद्रीस स्यीला यांनी दुसर्‍या सत्रात नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर सातव्या हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गुरुवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने दोन गोलांच्या पिछाडीवरून केरला ब्लास्टर्सविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली. पाचव्याच मिनिटाला खाते उघडणे, पहिल्या सत्रात दोन गोलांची आघाडी असणे, दुसर्‍या सत्रात प्रतिस्पर्धी पेनल्टी दवडणे अशा घडामोडी घडूनही ब्लास्टर्सला निर्णायक विजय नोंदविता आला नाही.
स्पेनचा ३० वर्षीय मध्यरक्षक सर्जिओ सिदोंचा याने पाचव्याच मिनिटाला ब्लास्टर्सचे खाते उघडले. त्यानंतर पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत इंग्लंडच्या गॅरी हुपरने पेनल्टी सत्कारणी लावत दुसरा गोल केला. घानाचा ३० वर्षीय स्ट्रायकर क्वेसी अप्पीया याने नॉर्थईस्टची पिछाडी उत्तरार्धाच्या प्रारंभी कमी केली. त्यानंतर अखेरच्या मिनिटाला गिनीचा बदली खेळाडू इद्रीस स्यीला याने नॉर्थईस्टला बरोबरी साधून दिली.

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर ब्लास्टर्सने धडाक्यात सुरुवात केली. स्पेनचा ३० वर्षीय फुटबॉलपटू सर्जिओ सिदोंचा याने ब्लास्टर्सचे खाते उघडले. सैत्यसेन सिंगने उजवीकडे मिळालेली फ्री किक घेत गोलक्षेत्रात चेंडू टोलवला. त्याच्या अचूक क्रॉस शॉटचा व्यवस्थित अंदाज घेत सिदोंचाने उडी मारत हेडिंग केले. त्यावेळी नॉर्थईस्टचा गोलरक्षक शुभाशिष रॉय याला अजिबात संधी मिळाली नाही.

पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत ब्लास्टर्सला पेनल्टी मिळाली. गोलक्षेत्रापाशी जोरदार धुमश्चक्री झाली. त्यातून चेंडू गोलक्षेत्राबाहेर गेला. त्यावेळी ब्लास्टर्सचा मध्यरक्षक लाल्थाथांगा खॉल्हरींग चेंडूवर ताबा मिळवून आगेकूच करीत होता, तोच नॉर्थईस्टचा बचावपटू राकेश प्रधान याने त्याला पाठीमागून पाडले. परिणामी रणजीत बक्षी यांनी ब्लास्टर्सला पेनल्टी बहाल केली. हूपरने त्यावर उजवीकडे फटका मारताना रॉयचा अंदाज चकविला.दुसर्‍या सत्रात नॉर्थईस्टने पिछाडी कमी केली. सेट-पीसवर त्यांचा गोल झाला. ब्लास्टर्सच्या ढिसाळ बचावाचा त्यांना फायदा झाला.

मध्य फळीतील फेडेरिको गॅलेगोने गोलक्षेत्रात चेंडू मारला. हा चेंडू आपल्यापाशी येताच क्वेसीने छातीने चेंडूवर नियंत्रण मिळविले. सुरुवातीला हुपरने चेंडू थोपविला, पण रिबाऊंडवर क्वेसीला पुन्हा संधी मिळाली. त्यावेळी जेसील कार्नेरीओ या ब्लास्टर्सच्या बचावपटूला चकवित क्वेसीने गोल केला.
नॉर्थईस्टला ६५व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली होती. क्वेसीने डावीकडे पास मिळताच लालेंगमावीया याच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण तोच जेसीर कार्नेरिओने त्याला पाडले. त्यामुळे नॉर्थईस्टला पेनल्टी बहाल करण्यात आली. ती घेताना क्वेसीने नेटच्या डाव्या कोपर्‍यात चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने उंचावरून फटका मारला. त्यामुळे चेंडू नेटवरून बाहेर गेला.अखेरच्या मिनिटाचा खेळ सुरू असताना इद्रीसला बचाव फळीतील गुरजिंदर कुमार याच्याकडून गोलक्षेत्रात पास मिळाला. त्याने छातीने चेंडूवर नियंत्रण मिळविले आणि व्यवस्थित अंदाज घेत रॉय याच्या उजवीकडून चेंडूला नेटची दिशा दिली.