>> योजनेत आवश्यक ते बदल करणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गोवा विधानसभेत माहिती
नैसर्गिक आपत्तींमुळे ज्या लोकांच्या घरांची मोडतोड आणि हानी होते, त्या लोकांना गोवा सरकारच्या ‘अटल आसरा’ योजनेखाली मदत देता यावी, यासाठी सदर योजनेत आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार संकल्प आमोणकर यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.
दरवर्षी पावसाळ्यात भूस्खलनामुळे घरे कोसळून पडणे अथवा झाडांच्या पडझडीमुळे घरांची मोडतोड होणे अशा घटना घडत असतात. अशा घटनांमुळे सदर घरांत राहणारी कुटुंबे बेघर होत असल्याचे सांगून सरकारकडून त्यांना घर दुरुस्तीसाठी पैसे मिळत नसल्याचे संकल्प आमोणकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
ज्या लोकांच्या घरांची नैसर्गिक आपत्तीमुळे मोडतोड होते, त्या लोकांची अन्य ठिकाणी राहण्याची सोय सरकार करीत असते; मात्र ते पुरेसे नसून अशा लोकांना घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत देणे आवश्यक असल्याचे मत आमोणकर यांनी यावेळी व्यक्त केले.
राज्यात नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढलेले असून, दरवर्षी पावसाळ्यात भूस्खलनासारख्या घटना घडत आहेत. आपल्या मुरगाव मतदारसंघातील सडा, बोगदा, हार्बर, रुमडावाडा आदी ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून भूस्खलनाच्या घटना घडू लागल्या असल्याचे आमोणकर यांनी सभागृहात सांगितले.
2022, 23 आणि 24 या सलग तीन वर्षी सलग भूस्खलनाच्या दुर्घटना घडून लोकांच्या घरांची मोडतोड झाली; मात्र त्यांना अद्याप सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचे आमोणकर यांनी सांगितले. आपण यासंबंधीच्या आठ फाईल्स संबंधित खात्याकडे पाठवलेल्या असून या लोकांना नुकसानभरपाई देण्याची सोय सरकारने करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
यावर हस्तक्षेप करताना मुख्यमंत्री म्हणाले की, या लोकांना नुकसानभरपाई मिळावी व त्यांना त्यांच्या मोडतोड झालेल्या घरांची दुरुस्ती व बांधकाम करता यावे यासाठी त्यांना राज्य सरकारच्या अटल आसरा योजनेखाली नुकसानभरपाई देण्यासाठी सदर योजनेत आवश्यक मदत करण्यात येतील.
नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे मोठे नुकसान झालेले आहे, त्यांना तात्काळ 2 लाख रुपये एवढी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पावसाच्या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्यांनाही नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंंत्र्यांनी स्पष्ट केले.
‘तो’ निधी का वापरत नाही? : आमोणकर
केंद्र सरकारकडून गोवा सरकारला आपत्ती व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असतो, असे असताना या लोकांना घर दुरुस्तीसाठी सरकार आर्थिक मदत का करीत नाही, असा प्रश्नही यावेळी संकल्प आमोणकर यांनी केला.
‘तो’ निधी फक्त आपत्तीवेळी मदतकार्यासाठी : मोन्सेरात
केंद्र सरकारकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्याला जो निधी मिळत असतो, तो नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लागणारी मदत कार्यासाठीची अवजारे खरेदी करण्यासाठी दिला जातो. सदर निधीचा वापर हा ज्या लोकांचे आपत्तीमुळे नुकसान झालेले आहे, त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी करता येत नाही, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.