- मीना समुद्र
आपली कविता हा श्री. भा. रा. तांबे यांनी जनताजनार्दनाला दाखवलेला नैवेद्य होय. ही श्रद्धाभक्तीची भावना आणि दुधाची वाटी आहे हे साधे सर्वसामान्यपण आपल्याला जाणवते. नैवेद्याइतकीच त्यांची सारी कविता अत्यंत शुचिर्भूत आहे. तिच्यात अर्पणभाव आहे.
गेल्या रविवारी म्हणजेच ७ डिसेंबरला ग्वाल्हेरचे राजकवी भा. रा. तांबे यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने त्यांच्या कवितांवरील ‘भा.रां.नी भारावलेले आपण’ या अत्यंत सुश्राव्य, सुमधुर अशा कार्यक्रमाची पूर्वीच प्रसिद्ध झालेली सौ. धनश्री लेले यांची ध्वनिचित्रफीत यू-ट्यूबवर पाहिली, ऐकली. कान आणि मन तृप्त (आणि अमृतही) करणारी त्यांची गाणी हा मराठी गीतांचा ठेवा आहे. मायमराठीला या राजकवीने भेट दिलेला तो अमोल, अनमोल नजराणा आहे. श्री. भा. रा. तांबे या कवीचे निरनिराळ्या संस्थानांत अत्यंत मानाची पदे भूषवीत असतानाचे अत्यंत जबाबदार, कर्तव्यदक्ष, चोख, परखड आणि कौटुंबिक लळाजिव्हाळा असलेले प्रेमळ, सोज्वळ व्यक्तिमत्त्व धनश्री यांनी उलगडत नेले आहे आणि त्यामुळेच कवितेच्या, गाण्याच्या अर्थ आणि आशयघनतेची अधिक खोल जाणीव आपल्याला त्यांचे निरुपण ऐकताना होते. अतिशय गोड गळ्याच्या सोबतच्या गायिकेने गायिलेल्या चिरपरिचित, अमर, अवीट गीतांनी आपल्या कानमनाची तहान आणखी वाढते, आपण आणखीन भारावून जातो.
अशा या पाच भागांच्या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं- ‘मधु मागसी माझ्या सख्या परी…’ वार्धक्याची चाहूल लागल्यावर कितीही नाही म्हटले तरी माणूस हळवा होतोच. त्याला संध्याछाया भिववितात. आजवर कमळाच्या द्रोणातून मधू रसिकांना पाजला, पण आता तो मधू पिळण्याचं बळ हातात नाही याची जाणीव आणि त्यामुळे आलेली खंत ‘मधुघट’मध्ये व्यक्त झालेली आहे. काव्यरसिकांची पत्रे आणि काव्याची मागणी यामुळे जवळचे मधुघट रिकामे होत चालल्याची कवीची जाणीव अतिशय प्रखर होत जाते. आता ती स्फूर्ती, ती चेतना उरली नाही ही जाणीव मनाला दुःखी करते आणि आतापर्यंत सुगंधी फुले तुला दिली, आता ही बिनवासाची, कुठेही, कशीही उगवणारी कोरांटी कशीतरी अंगणात जप असे त्यांनी मनाला आणि जनालाही सांगितलेसे वाटते.
तरुण-तरुणींची सलज्ज कुजबूज असणारी प्रेमगीते आणि वृक्षझर्यांचे गोड मधुर गुण ऐकवणारी, सृष्टिसौंदर्याचे वर्णन करणारी कविता यातून संसाराचं मर्म जे आजपर्यंत उलगडत गेलो तसे करण्याची विचारशक्ती, क्षमता वयानुसार क्षीण होत चालल्याची जाणीव फार तीव्रतेने या कवितेत तितक्याच साध्यासोप्या पण अत्यंत समर्थ, समर्पक शब्दांत व्यक्त झाली आहे; ती एकूण मानवी जीवनाचाच सारांश सांगणारी आहे असे वाटते. अशी अनेक तथ्ये आणि सत्ये जीवनभर उलगडत, कवितेतून मांडत गेलेल्या कवीला ही आपली शेवटचीच कविता असे वाटते की काय कोण जाणे! (अर्थात तशी ती नव्हती. यानंतरही ३०-३५ कविता त्यांनी लिहिल्या असल्याची माहितीही धनश्री यांनी सांगितली.) वय उताराला लागल्यावर थोडी असमर्थता जाणवते. आतापर्यंत अत्यंत सुंदर कविता आपण दिल्या. आता देऊ शकू की नाही अशी भावना मनात निर्माण होते. कदाचित पुढे येणार्या आजाराची चाहूल त्यांना लागली असेल म्हणूनच ते म्हणतात-
नैवेद्याची एकच वाटी, आता दुधाची माझ्या गाठी
देवपुजेस्तव ही कोरांटी वागवी अंगणी कशीतरी…
मधु मागसी माझ्या सख्या परी
मधुघटची रिकामे पडती घरी…
मनाची खंबीरता, स्फूर्ती, आत्मविश्वास थोडा डळमळीत झालेला असतानाही आपली ही कविताही त्यांनी तितक्याच ताकदीने लिहिली आहे. समर्थ कवीचे तेज हे ‘मावळत्या दिनकरा’च्या तेजाप्रमाणे या भास्कराचे तेज मावळत असतानाही फाकते, अंतःतेजाने प्रकाशते. उषःकालाप्रमाणेच संधिकालही अत्यंत रमणीय असतो. तितकाच ओजस्वी, तेजस्वी आणि प्रकाशमान, मनःशांती देणारा असतो. थोडी हुरहुर त्यात असतेच. अतिशय पवित्र असं ‘नैवेद्याच्या वाटी’चं उदाहरण म्हणूनच त्यांना सुचतं. नैवेद्याची ही ‘एकच वाटी’ म्हणजे त्यांना सुचलेली ही अखेरची कविता असे त्यांना वाटते आणि सकृत्दर्शनी आपल्यालाही. ही वाटी दुधाची आहे. काव्याला, रसिकाला पोषकच आहे, असं यातून सूचित होतं. षोड्सोपचारपूजेत नैवेद्य हा पूजेचा अंतिम टप्पा असतो. नैवेद्य दूध, साखर, गूळ, खोबरे, पंचामृत कसलाही असू शकतो. तो गोडाचाच असतो किंवा असावा अशीही समजूत असते. पण स्थानपरत्वे आणि व्यक्तिपरत्वे, दैवतपरत्वे तो भिन्न प्रकारचा आणि चवीचा असतो. गणपतीबाप्पांना मोदक, गौरीला करंज्या यांच्याबरोबर पेढेलाडू; अंबाबाईला पेढे, बासुंदी, खीर, पुरणपोळी; सरस्वतीला चुरमुरे, खोबर्याच्या वड्या असे पांढरेशुभ्र पदार्थ; दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनाला लाह्या-बत्तासे-पेढे-चुरमुरे; सत्यनारायणाला शिरा, मारुतीला खडीसाखर, राम-हनुमान जयंतीला सुंठवडा; शिवाला दहीभात, पंचामृत असे अनंत प्रकार नैवेद्याचे आहेत. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती.’ त्यामुळे हे नैवेद्य माणसांनीच देवावर आपल्या आवडीसवडी आणि कालमानानुसार ठरविले असावेत. श्रीफळ अथवा इतर फळे ही केव्हाही नैवेद्याला चालतात. नैवेद्याचे पावित्र्य देवाला वाहण्याच्या इतर वस्तूंप्रमाणेच जपले जाते. बर्याच ठिकाणी तो सोवळ्यात केला जातो. त्याचे कारण स्वच्छता आणि पावित्र्य जपणे हेच असावे. देवाला नैवेद्य दाखवून भोजन, प्रसाद ग्रहण सुरू करायचे असते. पूजेच्या शेवटी पाण्याचे चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्याचे स्वच्छ पात्र ठेवून भोवती पाणी फिरवून देवाला घास भरविल्यासारखी हाताची क्रिया केली की देव पावतो अशी श्रद्धा. नैवेद्य दाखविला की तो प्रसन्न होतो आणि तो सर्वांना वाटला जातो. त्याचे श्रद्धापूर्वक ग्रहण केले जाते. तो सांडू नये, पायदळी तुडवू नये असे संकेतही असतात.
आपली कविता हा श्री. भा. रा. तांबे यांनी जनताजनार्दनाला दाखवलेला नैवेद्य होय. ही श्रद्धाभक्तीची भावना आणि दुधाची वाटी आहे हे साधे सर्वसामान्यपण आपल्याला जाणवते. नैवेद्याइतकीच त्यांची सारी कविता अत्यंत शुचिर्भूत आहे. तिच्यात अर्पणभाव आहे. भा.रां.च्या संधिकालातल्या या सांध्यकिरणांनी आपले अंतरंग उजळून निघतात.