नेहरुंना स्वत:च्या प्रतिमेची चिंता; म्हणून गोव्याला उशिरा स्वातंत्र्य

0
14

>> पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि कॉंग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल हल्लाबोल केला. पंडित नेहरुंना गोव्याच्या स्वातंत्र्यापेक्षा त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची जास्त चिंता होती. त्यामुळेच गोव्याला १५ वर्षे उशिरा स्वातंत्र्य मिळाल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना कॉंग्रेस आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला.

गोवा मुक्तीच्या ६० व्या वर्षपूर्तीचा उल्लेख यावेळी पंतप्रधान मोदींनी केला. सरदार पटेल यांनी ज्या प्रकारे हैदराबाद, जुनागडसाठी धोरण आखले होते, त्याच प्रकारे पंडित नेहरुंनी गोव्यासाठी धोरण आखले असते, तर गोव्यातील जनतेला स्वातंत्र्यासाठी १५ वर्षांपेक्षा जास्त वाट पाहावी लागली नसती, असे मोदी म्हणाले. त्यावेळच्या माध्यमांतील वृत्तांकनावरून असे दिसून येते की, तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरुंना स्वत:च्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची काळजी होती. भारताच्या बंधू-भगिनींवर गोळीबार होत होता. अनेकांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. १५ ऑगस्ट १९५५ रोजी लाल किल्ल्यावरून बोलताना नेहरुंनी गोव्यात लष्करी कारवाई करणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. गोव्यावर कॉंग्रेसने हा मोठा अन्याय केला, असेही मोदी म्हणाले.