नेसाय येथे शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव

0
31

>> स्थानिकांचा विरोध; मंत्री सुभाष फळदेसाईंवर फेकली मातीची ढेकळे; समाजकंटकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार

मडगावपासून आठ-दहा किलोमीटर अंतरावरील सां जुझे दी आरियाल (नेसाय) येथील बेनाभाट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवण्यात आला; मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे वातावरण तंग बनले. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई हे शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करून परतत असताना काही समाजकंटकांनी त्यांच्या अंगावर मातीची ढेकळे आणि माती फेकल्याने ते किरकोळ जखमी झाले. परिणामी वातावरण अधिकच बिघडले. त्यानंतर पोलिसांनी समाजकंटकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला. या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असली तरी वातावरण तणावपूर्ण आहे. दरम्यान, सुभाष फळदेसाईंनी सर्वांना धार्मिक सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.

बेनाभाटी, सां जुझे दी आरियल येथे रविवारपासूनच शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून वातावरण तंग होते. खासगी जागेत मातीचा भराव टाकून रस्ता करण्याला रविवारी सकाळी स्थानिकांनी विरोध केला होता आणि तीव्र आक्षेप घेतला होता. त्या पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी जमीनमालकाची परवानगी न घेता रस्ता बनविला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. यानंतर लगेचच लोकांनी स्थानिक आमदार क्रूझ सिल्वा यांना बोलावून घेतले व खासगी जमिनीत अतिक्रमण केल्याची तक्रार केली. यानंतर मायणा-कुडतरी पोलीस निरीक्षक अरुण देसाई हेही घटनास्थळी पोहचले. यावेळी त्यांनी रस्ता सपाटीकरणासाठी आणलेली जेसीबी मशीन तेथून
हटवली.

डोंगरावर शिवपुतळा बसविण्यास विरोध नाही; मालक व पंचायतीची परवानगी नसताना मातीचा भराव टाकण्यास विरोध आहे, असे आमदार क्रूझ सिल्वा यांनी रविवारी म्हटले होते. पंचायतीचे उपसरपंच वोलन फर्नांडिस यांनीही हरकत घेतली होती. पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी नियम डावलून परवानगीविना रस्ता करण्यास स्थानिकांनी विरोध केला. यानंतर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर दोन्ही गटांत मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. यानंतर शिवप्रेमींनी रविवारीच त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा विराजमान केला होता.

या वादाच्या पार्श्वभूमीवर काल कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. काल सकाळी स्थानिकांनी शिवरायांचा पुतळा या ठिकाणी नको अशी भूमिका घेतली व ग्रामस्थ घटनास्थळी मोठ्या संख्येने गोळा झाले. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हे सोमवारी सकाळी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी बेनाभाटी येथे आले आणि त्यांच्या हस्ते निर्विघ्नपणे पुतळ्याचे अनावरणही झाले.

फळदेसाई हे अनावरण करून माघारी परतत असताना जमावाने त्यांना घेरले आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी जमावाने आपल्या गावात पुतळा नकोच, अशी भूमिका घेतली. तसेच मिरवणूक काढण्यासही विरोध दर्शवत फळदेसाईंना रोखून धरले. त्यावर फळदेसाईंनी स्थानिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच सदर जागा ही खासगी असून, काही हरकत असल्यास बैठक घेऊन तोडगा काढू असे सांगितले. मात्र त्यांच्या उत्तराने जमावाचे समाधान झाले नाही. त्यानंतर संतापलेल्या काहीजणांनी फळदेसाईंवर दगड आणि मातीची ढेकळे फेकली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी पोलिसांनी लाठीमार सुरू केला आणि जमावाला पांगवले. त्यात सामाजिक कार्यकर्ते फ्रेडी त्रावासो हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दक्षिण जिल्हा हॉस्पिटलात नेले. या घटनेमुळे नेसाय येथील वातावरण सध्या तणावपूर्ण बनलेले आहे.

जमीन दान केली, पण…
शिवरायांचा पुतळा बसविलेली जागा ही मकानदार नामक मुस्लिम जमीनदाराची असून, त्यांनी पुतळा बसविण्यासाठी त्यांनी ती जागा दान केली आहे. सदर जागेत जाण्यासाठी रस्ता नसून, त्या जमिनीचा मालक दुसरा आहे. पुतळ्याच्या निमित्ताने आपल्या जमिनीत जाण्यासाठी जायला रस्ता बनवून मिळेल या हेतूने सदर जागा दान केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

संवादाच्या बहाण्याने सुभाष फळदेसाईंना रोखले, अन्‌‍…
नेसाय येथे तणावाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे सुरुवातीला तणावपूर्ण शांतता होती. शिवपुतळा अनावरणानंतर सुभाष फळदेसाई परतत असताना स्थानिकांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा बहाणा केला. त्यामुळे फळदेसाई काही क्षणांसाठी थांबले. याचवेळी काही समाजकंटकांनी त्यांच्यावर मातीची ढेकळे आणि माती फेकली. मात्र पोलिसांनी लाठीमार करत समाजकंटकांना पांगवले.

ही घटना मुद्दाम घडवलेली : फळदेसाई
सां जुझे आरियाल येथे झालेल्या दगडफेकीत आपल्याला जबर मार लागलेला नाही, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले. तसेच या घटनेचा उगाचच बाऊ करू नये व कुणीही अल्पसंख्याकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करू नये. ज्या ठिकाणी पुतळा बसविण्यात आला आहे, ती जागा मुस्लीम बांधवाने दान केली आहे. या ठिकाणी आपणास झालेली अडवणूक आणि त्यानंतरची दगडफेक हे दोन्ही कुणीतरी मुद्दाम घडवून आणल्या आहेत, असा आरोप फळदेसाईंनी केला.