>> 48 तासांत संशयित जेरबंद; पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली
म्हापसा येथील नवीन बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या खुल्या शेतजमिनीत एका 33 वर्षीय नेपाळी तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह शनिवारी सापडला होता. या प्रकरणी तपासाअंती अवघ्या 48 तासांच्या आत म्हापसा पोलिसांनी संशयित करण महादेव शिंदे (19, रा. गिरी-म्हापसा) याला सोमवारी अटक केली. सोमवारी पर्वरी येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी ही माहिती दिली.
सविस्तर माहितीनुसार, म्हापसा पोलिसांना शनिवारी नबीन बीके या नेपाळी तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. पोलिसांनी 302 अन्वये एफआयआर नोंदवून तपास सुरू केला होता. नबीन बीके हा बार्देशमधील सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या एका कंपनीचा कर्मचारी होता. पोलिसांनी तपासकामात घटनास्थळी श्वानपथक आणि इतर शोध पथकाद्वारे संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी म्हापसा शहारातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. अखेर पोलिसांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजवर शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास नबीन बीके याच्याबरोबर संशयित करण हा दिसल्याचे पोलिसांना दिसून आले. त्याआधारे म्हापसा पोलिसांनी संशयिताला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलीस चौकशीत गुन्हा कबूल केला. दोघेही मद्यपानाच्या हेतूने शेजारच्या शेतात गेले. त्या ठिकाणी त्यांच्यात भांडण झाले आणि रागाच्या भरात करण याने नबीन याच्या मानेत मद्याची बाटली खुपसली. त्यानंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे नबीनचा मृत्यू झाला, अशी कबुली संशयिताने दिली.