नेपाळमध्ये बस अपघातात 16 महाराष्ट्रीयनांचा मृत्यू

0
5

>> उत्तर प्रदेशमधील बस नदीत कोसळली

महाराष्ट्रातील पर्यटकांना नेपाळ येथे घेऊन जाणाऱ्या उत्तर प्रदेशमधील बसला नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यात अपघात झाला. या अपघातात 16 प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काठमांडुमध्ये निघालेल्या या बसमध्ये एकूण 40 ते 41 प्रवासी होते व हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील होते. या अपघातात 16 ते 17 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात महाराष्ट्रातील एक प्रवासी बस मर्स्यांगडी नदीत कोसळून हा अपघात झाला. या बसमध्ये तब्बल 40 ते 41 प्रवासी होते. नेपाळमधील काठमांडूला सर्व भाविक जात असताना बसला अपघात झाला. याबाबत नेपाळच्या लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. तसेच, दुर्घटनेतून जखमींवर उपचार करण्यासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बस नदीत कोसळल्यानंतर त्यात सोळा मृतदेह आढळले. हे मृतदेह उत्तर प्रदेश रीलिप कमिश्नर यांनी स्वीकारून ते ज्या-ज्या जिल्ह्यातील असतील त्या-त्या जिह्यात शासनाच्या वतीने ते पाठविण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अधिक प्रवासी होते.
महाराष्ट्रातील एकूण 110 भाविक हे प्रयागराज येथून तीन बसमधून हे प्रवासी नेपाळमध्ये गेले होते. हे प्रवासी भुसावळ आणि आसपासच्या भागातील होते. या तीन बसपैकी एक बस घसरून अपघातग्रस्त झाली आणि महामार्गावरून 500 फूट खाली नदीत पडली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळ सरकारशी समन्वय साधून पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले.

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
या घटनेत अनेकांना जलसमाधी मिळाली असण्याची शक्यता असल्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. घटनास्थळी 45 जणांचे बचाव पथक पोहचले आहे. बस ज्या ठिकाणी पडली तिथे नदीची पाणी पातळी पावसामुळे वाढली आहे. बसला अपघाता झाल्यानंतर बसमधील अनेकजण बेपत्ता झाल्याचेही वृत्त आहे.