नेतान्याहूंनी इस्रायल-भारत मैत्रीचा दिला नवा नारा

0
99

इस्रायल शेती तंत्रज्ञानात अत्यंत प्रगत असून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून या देशाने कृषी क्षेत्रात प्रचंड बदल घडवला आहे. या देशाला शेतीतील वैविध्यपूर्ण पर्यायांचे ज्ञान आहे. शेतीत तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे. २०२२ पर्यंत आम्ही भारतातही शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कृषी उत्पन्न दुप्पट करणार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे प्रतिपादन केले. वद्राद येथील सोहळ्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या उपस्थितीत मोदी बोलत होते.

या कार्यक्रमानंतर अहमदाबाद जिल्ह्यातील डिओ धोलेरा गावात उभारण्यात आलेल्या आय क्रिएट सेंटरचे उद्घाटन मोदी व नेतान्याहू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना नेतान्याहू यांनी जय हिंद! जय भारत! जय इस्रायल! असा मैत्रीचा नवा नारा दिला. उभय देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध वाढविण्यासाठी तसेच भारतातील आपल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल नेतान्याहू यांनी मोदी यांचे आभार मानले.

धोलरा गावातील कार्यक्रमात नेतान्याहू म्हणाले की, हायफाच्या स्वातंत्र्यावेळी अनेक भारतीय सैनिकांनी आपली आहुती दिली. त्यापैकी अनेक गुजराती सैनिकही होते. त्यासाठीही गुजरातलाही त्यांनी धन्यवाद दिले. मोदींप्रमाणेच आपणही आशावादी आहे. आपण दोघेही विचारांनी तरुण व भविष्याबाबत आशावादी असल्याचे त्यांनी सांगितले. तर पंतप्रधान मोदी म्हणाले की आपण गेल्या वर्षी इस्रायलला गेलो उभय देशांमधील राजनैतिक संबंध अधिक मजबूत होण्याची आशा बाळगून. तेव्हापासून आपण नेत्यानाहू यांच्या भारत भेटीची प्रतीक्षा करत होतो. या पार्श्‍वभूमीवर आय क्रिएटचे उद्घाटन आपण दोघांनाही आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थेद्वारे इस्रायलचा अनुभव व त्यांच्या स्टार्टअप वातावरणामुळे येथील युवकांना प्रेरणा मिळेल असे ते म्हणाले.