भारताचे सागरी क्षेत्र जागतिक स्तरावरील समकक्ष देशांच्या तुलनेत झपाट्याने प्रगती करत आहे. 2025 हे वर्ष भारतीय सागरी क्षेत्रासाठी अनेक दृष्टींनी ऐतिहासिक ठरले आहे. पुढील काही वर्षे सागरी क्षेत्रासाठी आणखी महत्त्वाची ठरणार आहेत, कारण सरकारचा भर आता नील अर्थक्रांती (ब्लू इकॉनॉमी) वर आहे, असे प्रतिपादन पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.
‘ग्लोबल मॅरिटाइम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ या परिषदेत ते बोलत होते. ही परिषद मुंबईत सुरू असलेल्या ‘इंडिया मॅरिटाइम वीक’ दरम्यान झाली असून, त्यात धोरणनिर्माते, प्रमुख बंदरांचे अध्यक्ष, जहाजवाहतूक कंपन्यांचे सीईओ आणि स्टार्टअप संस्थापक सहभागी झाले आहेत. यावर्षी 85 देश, प्रमुख जहाजवाहतूक कंपन्या आणि बंदरांचे अध्यक्ष या परिषदेत सहभागी झाले आहेत. ही परिषद पाच दिवसांची (27 ते 31 ऑक्टोबर) असून, सर्व राज्य सागरी मंडळे, केंद्र आणि राज्य बंदरे त्यात सहभागी झाली आहेत. त्यात मुरगाव पोर्ट अथॉरिटी आणि पणजी येथील कॅप्टन ऑफ पोर्ट्स यांचाही समावेश आहे.
            
