>> लंडन उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला पुन्हा भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडनमधील उच्च न्यायालयाने बुधवारी यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निकालानुसार नीरव मोदीची भारतीय तपास यंत्रणांकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तपास होणार आहे.
नीरवला परत आणण्यासाठी भारतीय एजन्सींनी सरकारी आणि कायदेशीर पातळीवर अपील दाखल केले होते. यामध्ये नीरवने भारताच्या बँकिंग व्यवस्थेशी फसवणूक केल्याचे म्हटले होते. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याला भारतीय एजन्सींच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली होती.
नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी लंडन न्यायालयात भारताकडून सातत्याने बाजू मांडली जात होती. याविरोधात नीरव मोदीनं लंडन उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र, काल या याचिकेच्या सुनावणीदरम्यान लंडन न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नीरव मोदीच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, लंडनमध्ये ऐषारामात जगणार्या नीरव मोदीने आपल्या बचावात अनेक युक्तिवाद केले. नीरव याने यावेळी आपल्याला भारतीय एजन्सींच्या ताब्यात देऊ नये अशी मागणी केली होती. मात्र कनिष्ठ न्यायालयाने त्याला भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतल्यावर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आता उच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळून लावली आहे.
१४,५०० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
नीरव मोदी आणि मेहुल चौक्सी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची १४,५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बँकेकडून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांचा नीरव मोदीच्या ताब्यातील कंपन्यांना फायदा झाल्याचा आरोप या घोटाळ्यात करण्यात आला होता. मोदी याला भारतात आणल्यानंतर त्याला मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बॅरेक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येणार आहे.