नीरज चोप्राची थेट अंतिम फेरीत धडक

0
8

भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत काल अंतिम फेरीत धडक दिली. काल भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडली, त्यात नीरजने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भाला फेकून अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीत 84 मीटर भाला फेकल्यास थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. नीरजने 84 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकल्याने त्याने थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

भारतीय महिला कुस्तीपटू प्रथमच अंतिम फेरीत

भारताच्या विनेश फोगट हिने काल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिवसभरात अप्रतिम कामगिरी केली. विनेशने पहिल्यांदा महिलांच्या 50 किलो वजनी गटातील कुस्तीच्या राऊंड ऑफ 16 च्या सामन्यात जपानच्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव केला. आंतरराष्ट्रीय कुस्तीत सुसाकी हिचा पहिल्यांदाच पराभव झाला. त्यानंतर युक्रेनची ओक्साना लिवाच हिचा तिने उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. विनेशने उपांत्यपूर्व सामना 7-5 च्या फरकाने जिंकला. यानंतर उपांत्य फेरीत विनेशने क्युबाच्या कुस्तीपटू वाय. गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.