नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे सनबर्नबद्दल वक्तव्य दुर्दैवी ः पाटकर

0
10

सनबर्नसारख्या ‘ड्रग फेस्टिव्हल’मुळे गोव्याला जागतिक मान्यता मिळाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नीती आयोगाच्या बैठकीत केले होते ते दुर्दैवी असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भाषण आणि गोव्याच्या विकासात काँग्रेसचे योगदान नाही, या केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना श्री. पाटकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

गोव्यात चोगम रिट्रीट 1983 साली श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन काँग्रेस सरकारने आयोजित केल्याने गोव्याला जागतिक क्षितिजावर नेले. गोव्याची संस्कृती आणि वारसा यांना जागतिक ओळख आहे. भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृहपाठ करून सनबर्नला याचे श्रेय देणे बंद करावे, असे पाटकर म्हणाले. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी, 2012 मध्ये गोव्याच्या पतनाची सुरुवात भाजपने मागच्या दरवाजाने सत्ता काबीज केल्यानंतर झाली हे जाणून घ्यावे असे आवाहन केले. भाजपने म्हादईशी तडजोड, खाण बंदी आणि पर्यटन संपवणे, मोठ्या प्रमाणावर जमिनीचे रूपांतरण, सर्वाधिक बेरोजगारी, मिशन टोटल कमिशन, गोवा क्राइम डेस्टिनेशन बनवणे हे डबल इंजिन सरकारचे योगदान आहे, असा आरोप अमित पाटकर यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच गोमंतकीयांच्या भावनांचा आदर केला आणि गोवा मुक्तीपासून ते घटकराज्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात योगदान दिले. काँग्रेसने पूल, गोमेकॉ इस्पितळ प्रकल्प, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, रवींद्र भवन, केंद्रीय ग्रंथालय, गोवा विद्यापीठ आणि इतर विविध प्रकल्प बांधले. आम्ही पर्यावरण, वन आणि वन्यजीवांचे संरक्षण करून विकास घडवून आणला, असे अमित पाटकर म्हणाले. नीती आयोगाच्या बैठकीत खोटी आणि दिशाभूल करणारी वस्तुस्थिती मांडल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावरही टीका केली.