नीट : शहर व केंद्रनिहाय निकाल जाहीर करा : सर्वोच्च न्यायालय

0
10

नीट-यूजी पेपर फुटी प्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ला उमेदवारांची ओळख लपवून शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले. एनटीएने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हे निकाल प्रसिद्ध करावेत, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने वादग्रस्त ठरलेल्या नीट-यूजी 2024 शी संबंधित सर्व याचिकांवर काल निकाल दिला.

प्रत्येक परीक्षा केंद्राचा स्वतंत्र निकाल जाहीर करावा, असे आदेश देत सरन्यायाधीशांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार दि. 22 जुलै रोजी होईल, असेही सांगितले. दरम्यान, 24 जुलैपासून नीट-यूजीचे समुपदेशन सुरू होईल, असे या सुनावणीवेळी एनटीएने न्यायालयात सांगितले.