‘नीट पीजी’ परीक्षा अखेर पुढे ढकलली

0
7

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नीट पीजी परीक्षा २०२२ सहा ते आठ आठवड्यांनी पुढे ढकलली आहे. याआधी ही परीक्षा १२ मार्च रोजी होणार होती. आता ती परीक्षा मे-जून मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शिवाय परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा देखील लवकरच होऊ शकते. १२ मार्च रोजी होणारी परीक्षा नीट पीजी काऊन्सेलिंग संपण्यापूर्वीच आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांशी संबंधित कारणांमुळे मे-जूनमध्ये ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या काळात होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी देखील विद्यार्थ्यांची मागणी होती. ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली होती. या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती.

याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा दावा केला होता की, कोविड-१९ मुळे एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थी त्यांचा इंटर्नशिप कालावधी पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे ते परीक्षेला बसू शकणार नाहीत. अशा स्थितीत जोपर्यंत इंटर्नशिप पूर्ण होत नाही तोपर्यंत परीक्षेची तारीख वाढवावी, अशी त्यांची मागणी होती.