नीट परीक्षेतील वाढीव गुण अखेर रद्द

0
5

>> निकाल रद्द केलेल्या 1,563 मुलांना पुन्हा परीक्षा देता येणार

‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकारांबाबत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. नीट परीक्षेत वाढीव गुण (ग्रेस मार्क) मिळालेल्या 1,563 मुलांचे निकाल रद्द केले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान दिली. तसेच, निकाल रद्द झालेल्या मुलांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभा सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नीट परीक्षेतील हेराफेरीच्या आरोपांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तीन याचिकांवर काल सुनावणी पार पडली. 4 जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांची एसआयटी किंवा तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली होती. नीट परीक्षा आयोजित करणारी संस्था ‘नॅशनल टेस्ट एजन्सी’ (एनटीए) कडून विद्यार्थ्यांना परीक्षेत दिलेल्या वाढीव गुणांबाबत काल सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला.

वाढीव गुण मिळालेल्या 1,563 उमेदवारांच्या गुणपत्रिका रद्द केल्या जातील, असा प्रस्ताव केंद्राने सर्वोच्च न्यायालयात मांडला होता. तसेच वाढीव गुणांशिवाय गुणपत्रिका जारी केल्या जातील, असेही केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

या उमेदवारांची 23 जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. 30 जूनपूर्वी निकाल जाहीर होईल. जेणेकरून जुलैपासून सुरू होणाऱ्या समुपदेशनावर परिणाम होऊ नये आणि 6 जुलैच्या आधीच ठरलेल्या तारखेपासून सर्व मुलांचे समुपदेशन एकत्रितपणे करता येईल.
परीक्षेला बसू न इच्छिणाऱ्या उमेदवाराचा निकाल वाढीव गुणांशिवाय जुन्या गुणपत्रिकेच्या आधारेच विचारात घेतला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचा हा प्रस्ताव मान्य केला आहे.