निस्तेजपाल

0
129

भारतामध्ये शोधपत्रकारितेचे नवे मानदंड निर्माण करणार्‍या, परंतु व्यक्तिगत जीवनात पाय घसरलेल्या तरूण तेजपाल यांच्याविरुद्ध अखेर विनयभंग आणि बलात्काराच्या खटल्याचे कामकाज लवकरच सुरू होणार आहे. या खटल्याची सुनावणी उच्च न्यायालयापुढे आपली याचिका प्रलंबित असल्याने महिनाभर पुढे ढकलावी ही याचिकादाराची मागणी न्यायालयाने अमान्य केल्याने आता त्याच्याविरुद्धच्या आरोपांची सुनावणी एकदाची सुरू होईल. गुन्हा घडला २०१३ साली. आता २०१७ साल संपत आले आहे. दरम्यान चार वर्षे गेली. त्यामुळे तक्रारदार, साक्षीदार यांना काही गोष्टींचे विस्मरण घडू शकते. त्याचा परिणाम अर्थातच न्यायालयीन सुनावणीवर होऊ नये आणि त्याचा फायदा कथित गुन्हेगाराला मिळू नये अशी अपेक्षा आहे. या प्रकरणातील तेजपाल यांची एकूण वैचारिक पार्श्वभूमी, त्यांना असलेले राजकीय पाठबळ आणि असलेला तितकाच तीव्र राजकीय विरोध यामुळे या प्रकरणाला आजवर नाना रंग चढले. खुद्द तेजपाल यांनी हे प्रकरण उजेडात आल्यापासून त्यातून अंग काढून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. गोव्यात आयोजित केलेल्या ‘थिंकफेस्ट’ महोत्सवावेळी सदर प्रकार घडला होता. परतल्यानंतर पीडित मुलीने आपल्या प्रकाशनसंस्थेकडे ईमेलद्वारे तक्रार नोंदवली. त्यानंतर तेजपाल आणि शोमा यांच्यात झालेल्या ईमेलच्या आदानप्रदानचा तपशील माध्यमांमध्ये उघड झाला आणि या प्रकरणाचे गांभीर्य सर्वांना कळून चुकले. स्वतः तेजपाल यांनी मात्र कधी ‘बॅड लॅप्स ऑफ जजमेंट’ म्हणून, कधी आपण त्या मुलीशी ‘प्लेफुली अँड फ्लर्टियसली टॉकिंग अबाऊट सेक्स’ करीत होतो असे संबोधून, तर कधी आपण जे केले ते ‘लायटर मूड’ मध्ये केल्याचे सांगून आपले हात झटकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या ईमेल बाहेर फुटल्या आणि मोठा गहजब झाला, तेव्हा त्यांनी आपण सहा महिने ‘तेहलका’च्या संपादकपदावरून दूर राहण्याची तयारी दर्शवली. परंतु केवळ संपादकपदावरून सहा महिने दूर राहणे ही काही त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणता आली नसती. त्यामुळे देशभरातून निषेधाच्या जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आणि तेजपाल घेरले गेले. योगायोगाने तेव्हा गोव्यात भाजपचे सरकार होते आणि तेजपाल यांच्या ‘तहलका’ने भाजपविरोधात उघडलेली आघाडी सर्वविदित होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना लाच स्वीकारताना याच ‘तेहलका’ च्या पत्रकारांनी रंगेहाथ पकडून दिले होते. त्यामुळे त्याचा वचपा काढण्याची संधी भाजप सरकारला आपोआप चालून आली आणि त्यातून म्हणा वा पीडितेला न्याय देण्याच्या भावनेतून म्हणा, परंतु हे प्रकरण धसास लागले. एकूण घटनाक्रम पाहिला तर असे दिसते की, आपल्याविरुद्ध गुन्हाही नोंद झालेला नसताना अटकेची चाहुल लागल्याने त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवला, गोवा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असता समन्स उशिरा मिळाल्याचे कारण देत चौकशीस सामोरे जाण्याचे टाळणार्‍या तेजपाल यांच्या वतीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज मात्र वेळीच सादर झाला होता. तेव्हाच या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होतील याची चिन्हे दिसू लागली होती. अखेर तेजपाल यांना अटक झाली आणि सडा उपकारागृहात खारी हवा खाण्याची पाळी त्यांच्यावर ओढवली. दरम्यानच्या काळात केंद्रात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस सरकारमधील पाच बडे मंत्री तेजपाल यांची पाठराखण करीत असल्याचा जाहीर आरोप सुषमा स्वराज यांनी ट्वीटरवरून केला होता. एका राष्ट्रीय नियतकालिकाने तर पीडित तरुणीच्या निवेदनांत कशी तफावत आहे यावर मुखपृष्ठकथाच प्रकाशित करून तेजपाल निर्दोष असून त्यांना नाहक गोवले जात असल्याचे सुचवण्याचाही प्रयत्न करून पाहिला. तेजपाल यांचे पाठीराखे आणि विरोधक या दोन्हींची या प्रकरणावर जवळून नजर आहे. त्याची साक्षही आजवरच्या अशा घडामोडींतून मिळाली आहे. पण केवळ राजकीय सूड म्हटल्याने तेजपाल यांच्या हातून घडलेल्या घृणास्पद अपराधाचा कलंक पुसला जाऊ शकत नाही. लिफ्टमध्ये काय घडले ते जरी कोणी पाहिले नसले तरी पीडितेने दिलेला तपशील, बाकी परिस्थितीजन्य पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब यातून तेजपाल घेरले गेलेले आहेत. या प्रकरणात ते दोषी आहेत की निर्दोष ते न्यायालय ठरवेलच, परंतु निदान ती न्यायप्रक्रिया आता सुरू होईल हेही नसे थोडके. तरुण तेजपाल हे भारतीय पत्रकारितेला शोधपत्रकारितेचा नवा आयाम देणारे धाडसी पत्रकार होते. ‘आऊटलूक’ च्या उभारणीतील त्यांचे योगदान निर्विवाद होते. लेखक आणि प्रकाशक म्हणूनही त्यांनी कीर्ती संपादन केली होती. अरुंधती रॉयचे ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स’ त्यांनीच प्रकाशित केले होते. परंतु आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणीशी त्यांनी गैरवर्तन केले आणि ही सारी उज्ज्वल कारकीर्द एका फटक्यात धुळीस मिळाली हे मात्र खरे.