निसर्ग माझा सखा

0
3
  • कु. अनंत गवंडी
    (इयत्ता : बारावी,
    शारदा उ. मा. विद्यालय, भेंडाळे, वझरी, पेडणे)

‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे…’ या ओळीतून संत तुकारामांनी निसर्गाची, वृक्षवेलींची महती गायली आहे. जमीन, आकाश, प्राणी यांबरोबरच निसर्गातील प्रत्येक घटक परमेश्वराने आपल्यासाठी तयार केलेला आहे. खरंच, मानवप्राण्याला निसर्गाचं वरदान लाभलं आहे.
निसर्ग हा माझा सखा-सोबती आहे. सखा म्हणजे अगदी नित्य, नेहमी आपली सोबत करणारा… जो आपल्यावर चांगले संस्कार करतो आणि काही चुकलं तर प्रसंगी आपले कानही धरतो. श्रीगुरुदत्त म्हणतात- ‘जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरू म्या केला जाण।’ त्याप्रमाणे निसर्गातील प्रत्येक घटक हा आपला गुरूच असतो.

ही हवा म्हणजे आपणा सर्वांचा प्राणवायू आहे. कल्पना करा की, जर हवाच नसेल तर आपण श्वास तरी घेऊ शकतो का? निसर्गातील जमीन सस्य शामल आहे, जिच्या योगे शेतकरी बांधव शेत पिकवतात आणि ते धान्य आपले उदरभरण करते. ती जमीन, ते पाणी या निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

आपल्या आजूबाजूचे पर्वत, नद्या, झाडे, लता, वेली आपल्याला नेहमीच उपयोगी पडतात. अगदी शुद्ध हवेपासून ते फुले, फळे, तसेच स्वतःचा अवयवही आपल्याला देतात. महत्त्वाचे म्हणजे, जेथे आम्हाला छोटी-मोठी सर्दी, खोकला होतो, तेव्हा माझी आजी अडुळसा, कोरफडी यांसारख्या वनस्पतींचा काढा देते आणि माझ्या आजाराला पळवून लावते.
आकाशातील सूर्य, चंद्र, तारे, ग्रह हेसुद्धा या निसर्गाचाच भाग आहेत. ते नित्यनेमाने उगवतात आणि आम्हाला सर्वप्रकारचे पर्यावरण देतात. त्यांचे हे उगवण्याचे वेळापत्रक मला फार आवडते. रोज सकाळी झोपेतून मला आई उठवते; मग मला प्रश्न पडतो या सूर्याला रोज सकाळी कोण बरे नित्यनेमाने उठवत असेल? अगदी वेळापत्रकाप्रमाणे तो वेळेवर कसा काय उठतो? या विचारातूनच मी वेळेच नियोजन कसे असावे हे शिकले. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे सृष्टीचे वेळापत्रक आपल्याला निसर्गमित्राने दिलेले आहे. खरेच या निसर्गाने आपल्याला किती आणि काय काय दिला आहे… त्याची गणती करावी तेवढी थोडीच. म्हणूनच मी म्हणतो, निसर्ग माझा खरेच सखा-सोबती आहे.