निसर्गातील उत्तम फळ आवळा

0
15
  • डॉ. मनाली महेश पवार

ताजा पक्व आवळा दीपन, पाचन, पित्तशामक, मूत्रजनन, रोचन, बल्य, पौष्टिक, कांतिवर्धक, त्वचारोगनाशक आहे. निरोगी माणसाने ताजे आवळे रोज खाल्ल्यास शरीरातील सर्व क्रिया सुधारून प्रकृती चांगली राहते. म्हणूनच ताजा आवळा हा रसायनस्वरूपी आहे. ताजा व पक्व आवळा आपल्या आहारात असल्यास सोन्याहून पिवळे!

मानवाला ज्ञात असलेला सर्वात प्राचीन नैसर्गिक पौष्टिक पूर्णान्न म्हणजे ताजी फळे व सुका मेवा. शरीराला पोषक व आवश्यक तत्त्वांचा पुरेसा साठा फळांत असतो. फळे पचायला सुलभ असतात, त्यामुळे रक्त शुद्ध होणे, पचनसंस्था निकोप ठेवणे यासाठी फळांचा आहारात समावेश लाभदायक ठरतो.
फळे किंवा फळांचे रस शरीरातील आर्द्रता कायम ठेवतात. फळांमुळे शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा मिळते. कारण फळांतून साखर व खनिजांचा पुरवठा केला जातो. फळांनाच पूर्णान्न मानणाऱ्या व्यक्तींचे आरोग्य उत्तम राहते. फळे आजारी, अपंग व अशक्त व्यक्तींना त्वरित उष्णता व ऊर्जा मिळवून देतात.
फळांतील तंतुमय भाग म्हणजेच सेल्युलोज पचनसंस्थेमधून अन्नाचा सहज प्रवास करण्यास व टाकाऊ पदार्थ एकत्र करून मलाशयात नेण्यास उपयुक्त ठरतो. फळांतील क्षार व आम्ले यांच्यापासून अल्कलाईन कार्बोनेट्स तयार होतात व शरीरान्तर्गंत द्रावण अल्कलीयुक्त बनवतात. त्यामुळे आतड्यातील टाकाऊ पदार्थ पुढे पुढे नेले जातात. त्यामुळे रक्तावर हे टाकाऊ पदार्थ वाहून नेण्याचा ताण कमी होतो व रक्त अधिक प्रवाही बनते.
निसर्गाने आपल्याला फळांच्या रूपात औषधांचा खजिनाच दिला आहे. आहारात फळांचा सढळ वापर केल्यास माणसाला निरोगी आयुष्य जगता येते. कारण फळे रोगप्रतिकारक आहेत. ऋतुमानाप्रमाणे येणारी फळे आपण नियमित सेवन करावी.

सध्या आवळ्याचा ऋतू सुरू झाला आहे. दीर्घकाळ निरोगी आयुष्य देण्याकरिता श्री ब्रह्मदेवाने या पृथ्वीवर आवळा वृक्षाची योजना केलेली आहे. प्राचीन काळापासून समस्त मानवांना आपल्याला कदापि म्हातारपण येऊ नये, आपल्या त्वचेवर सुरकुत्या येऊ नयेत, आपले दैनंदिन काम- मग ते शारीरिक असो वा बौद्धिक- खूप आत्मविश्वासाने करावे असे नेहमीच वाटते. अशा मानसिकतेमुळेच जगभर ‘च्यवनप्राश’ या एकमेव बल्य टॉनिकचा चाहता वर्ग आहे. त्यामुळे खरेच प्रत्येकाने रोज सकाळी घरातून बाहेर पडताना 1-2 चमचे च्यवनप्राश नक्की सेवन करावे. त्यामुळे थकवा नाहीसा होऊन खूप उत्साहाने काम करता येते.
ताजा पक्व आवळा दीपन, पाचन, पित्तशामक, मूत्रजनन, रोचन, बल्य, पौष्टिक, कांतिवर्धक, त्वचारोगनाशक आहे. निरोगी माणसाने ताजे आवळे रोज खाल्ल्यास शरीरातील सर्व क्रिया सुधारून प्रकृती चांगली राहते. म्हणूनच ताजा आवळा हा रसायनस्वरूपी आहे. ताजा व पक्व आवळा आपल्या आहारात असल्यास सोन्याहून पिवळे!
आवळकाठी स्तंभन, श्लेष्मघ्न, शोणितस्थापन आणि मोठ्या मात्रेत पित्तस्रावी व संस्रक आहे. शुष्क आवळकाठी एक वर्षाची जुनी जरी असली तरी तिच्यामध्ये सत्तर-ऐंशी टक्के औषधी गुण असतात, हे आवळकाठीचे वैशिष्ट्य आहे.
आवळ्यात लवण सोडून बाकी पाचही रस असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक विकारांत आवळ्याचा पोटात घेण्यासाठी व बाह्य उपचारार्थ खूप उपयोग होतो.

  • दिवसेंदिवस तमाम तरुणाई आपल्या केश समस्येकरिता खूप जागरूक असते. केसांत कोंडा होणे, खवडे, केस गळणे व पिकणे या चतुर्विध समस्यांकरिता आवळ्यापासून तयार केलेले रसायनचूर्ण सेवन करावे. महिन्या- पंधरा दिवसांतच नक्की फरक पडतो.
  • आवळकाठीपासून तयार केलेले आवळा तेल खूप विश्वासाने आपण वापरत असतोच.
  • चेहऱ्याच्या त्वचेवरील तारुण्यपीटिकांवर मात करण्यासाठी आवळकाठीचूर्णाचा उपयोग करावा. उत्तम पोषण देणारे धात्रीरसायन आवर्जून सेवन करावे.
  • आवळ्याच्या शीतवीर्य गुणांमुळे शरीरातील रक्तातील उष्णता व स्निग्धता कमी होते. त्याचबरोबर रक्तधातू सुधारून बाह्यत्वचेला आकर्षक वर्ण प्राप्त होतो. म्हातारपणातील प्रमुख लक्षण म्हणजे त्वचेवरील वाढत्या सुरकुत्या. त्यामुळे आवळ्याच्या विविध कल्पांचे आहारात सेवन करावे. या सुरकुत्या कमी करण्याचे कार्य आवळ्यात आहे.
  • आवळ्यात लवण रस नसल्यामुळे शरीराचे कशाही प्रकारे कर्षण न करता, उत्तम पोषणार्थ धात्रीरसायन आहे.
  • आवळ्याच्या विविध कल्पांच्या वापरामुळे शरीरातील फाजील चरबी न वाढवता अस्थी, मज्जा, शुक्र व ओज यांची आरोग्यदायक वाढ होते.
  • आवळ्याचे योग्य तऱ्हेने सेवन केल्यास शरीरात उत्तम रोगप्रतिकारशक्ती येते.
  • ज्यांना नाइलाजाने दूषित वातावरणात व सातत्याने रात्रपाळी व अवेळी काम करावे लागते, त्यांनी रसायनचूर्ण नियमितपणे घ्यावे.
  • आवळा, हरडा व बेहडा या तिन्हींच्या संयोगास ‘त्रिफला’ म्हणतात. या सर्व रसायनांमध्ये श्रेष्ठ, नेत्ररोगनाशक, व्रणरोपण, त्वचारोग, व्रणस्राव, मेह, मेदोरोग, कफ व रक्तपित्त यांचा नाशक आहे.
  • वाळलेल्या आवळकाठीतील बी फोडावे. त्यात असणारे उडीदडाळीसारखे छोटे बी दह्यात वाटावे व खाज, आग ही लक्षणे असणाऱ्या त्वचाविकारात आंघोळीच्या अगोदर घासून लावावे.
  • विविध प्रकारच्या आम्लपित्त, उलटी, ॲसिडिटी अशा लक्षणांत कोणताच आंबट पदार्थ कधीच खाता येत नाही. त्याला अपवाद म्हणजे आवळा. त्याकरिता तोंडी लावणी म्हणून आपल्या जेवणात चटणी करायची असल्यास आवळ्याचा अवश्य समावेश करावा.
  • महिलांच्या प्रदर, धुपणी या विकारांच्या वाढत्या समस्यांच्या निवारणाकरिता आवळकाठी चूर्णासारखे सकाळ-संध्याकाळ घेण्यास योग्य व स्वस्त औषध दुसरे कोणतेही नाही.
  • ज्यांना काही कारणाने बाहेरचे जेवण नेहमीच घ्यावे लागते व खूप जास्त तहान लागते त्यांनी भोजनोत्तर घरी केलेल्या आवळासुपारीचा आस्वाद जरूर घ्यावा. नाइलाजाने विपरीत आहारविहार करावा लागत असेल तर आपल्या रक्तात विविध क्षार, अम्लता व बाह्यकृमींचा संसर्ग होऊ शकतो, त्यासाठी आवळा नेहमी सेवन करावा.
  • नेत्रविकार व त्वचाविकारार्थ महात्रैफलघृत व महातिक्तघृताचा वापर सत्वर गुण देतो.
  • सध्या आवळ्याचा ऋतू चालू होत आहे, त्यामुळे मुक्तहस्ताने आवळ्याचा आहारात- औषधात समावेश करावा.
  • मोरावळा, आवळेसुपारी, आवळाज्यूस, आवळकॅन्डी, आवळा लोणचे इत्यादी पदार्थ घरात बनवून ठेवावे व वर्षभर या पदार्थांचे सेवन करावे.
  • जीवनसत्त्व ‘सी’ भरपूर प्रमाणात मिळणाऱ्या आवळ्याचे नित्य सेवन करावे. स्वस्थ माणसांनी स्वास्थ्य टिकवण्यासाठी व आजारी माणसांनी आपला आजार बरा करण्यासाठी आवळा खावा व कार्तिक महिन्यात आवळी भोजन करायला विसरू नये.