निसर्गाचं देणं

0
194
  • गौरी भालचंद्र

 

रानावनात असलेली काटाकुट्यांनी वेढलेली वाट खरंच दिसताना काटेरी भासते पण त्या काट्यातून चालताना सभोवताली असलेलं निसर्गाचं देणं.. खूप सुख देऊन जातं..  मग तो फुलांचा सुगंध, फळे, फुले, अलगद येणारा आणि अंगावर शहारे आणणारा तो वारा…

 

मला वाटतं… प्राजक्ताच्या फुलांचा निर्मळ सडाच असतो बालपणातले अनुभवलेले क्षण… म्हणजे… मनाला सुखावणारे … प्रत्येक गोष्टीत उत्साह … उत्कटता असते … आनंद असतो… आकाशाच्या पाटीवर तांबूस असा सूर्याचा गोळा … झेंडूच फुलारतो … तांबूस सोनेरी कोवळ्या सूर्यकिरणांतून … पाहात राहावा असा … ते रम्य रूप मनाला आल्हाद देतं अगदी…!  बालपणाचंही तसंच आहे … बालपणातील आठवणींचे ठसेही त्यावेळी प्रत्येकाच्या कोवळ्या मनावर कायम कोरले जातात … नदीकाठच्या वाळूत उठलेल्या हत्तीच्या पावलांसारखे खोलवरती गेलेले …

जाईजुईपेक्षाही सुवासिक अशी कुसरीची फुलं मी थिवीला असताना गोळा करायचे नेहमी. त्या रानफुलांच्या वासाने मन सुखावून जायचं. पांढरी शुभ्र अशी कुसरीची फुले निसर्गसौंदर्यात भर टाकणारी.. आपल्या सुवासानं सार्‍या रानावनातून दरवळणारी … पोह्यासारखी दिसणारी रानफुले उगवायची त्याला ‘सीतेचे पोहे’ म्हणतात असं सांगायची आजी …  पिवळीजर्द हरणाची रानफुलंही भावायची मला तितकीच… नाजुकशी, पाहात राहावीशी वाटणारी … सुंदर फुलांवर पंख हलवत बसलेली नाजूक देखणी फुलपाखरं… त्यांच्या मागनं धावायचा तर छंदच जडला होता मला…

थिवीला असताना मी फार लहान होते… शाळेतही जात नव्हते… तिथले उंच उंच डोंगर… सभोवार पसरलेले काळेभोर कातळ … त्याच्या आजूबाजूला पसरलेली सुंदर अशी हिरवळ … मी लहानपणी धावत जाऊन त्या दगडांवर बसायचे… सपाट दगड शोधून!  त्या दगडांना बारीक बारीक भोकंही असायची… कोरीव काम केल्यासारखी.. त्यांची रचनाही तशीच उंचसखल … कधी एखाद्या कातळाला टोकही असायचं, धारदार.  तिथल्या रानात डबकीही  पसरलेली असायची लहानमोठी… त्यातील छोटी छोटी बेडकं .. लहानसे सुळकुले मासे … किती छान वाटायचं त्यांना पाहताना… तासन्‌तास मी त्यांच्या करामतींकडे बघत बसायचे… त्यांना खाऊ टाकला की ते वरती येत नि तोंडात घेऊन पटकन खाली जात …

ठाण्यातल्या रानातून फिरताना आम्ही मुलं साखर घेऊन जायचो… भिरंड गोळा करायचो आसपासची… हिराने भोकं पडून छान साखर भरायचो त्यात.. नंतर ते फळ चोखून खाताना मस्त वाटायचं अगदी…

बाप्पाआजोबांकडे असताना कितीतरी मोर त्यांच्या मागीलदारी यायचे. त्यांची पीसही पडायची तिथे…ती साठवली होती मी. आता मोरांची संख्या कालमानाप्रमाणे कमी झाली आहे, तरीही थोड्या फार प्रमाणात मोर आढळतात.

कसं असतं ना, माणसाला आपलं जीवन सुखकर असावं असं नेहमीच वाटतं.. पण स्वतः ओढून आणलेलं सुख आणि आयतं भेटलेलं सुख यात खूप फरक दिसून येतो… काही वाटा माणसाला स्वतःच बनवाव्या लागतात. स्वतःचे मार्ग स्वतः तयार करावे लागतात  तेव्हा कुठे समजतं त्यातलं सुख… रानावनात असलेली काटाकुट्यांनी वेढलेली वाट खरंच दिसताना काटेरी भासते पण त्या काट्यातून चालताना सभोवताली असलेलं निसर्गाचं देणं.. खूप सुख देऊन जातं..  मग तो फुलांचा सुगंध, फळे, फुले, अलगद येणारा आणि अंगावर शहारे आणणारा तो वारा, इकडून तिकडे उडणारी फुलपाखरे, पक्षांचा किलबिलाट, वाहता झरा आणि त्या पाण्याचा होणारा खळखळाट … किती मोहिनी घालणारे हे सगळं!!!