निष्पक्ष चौकशीसाठी स्मृती इराणींना डच्चू द्या

0
14

>> सिली सोल्स प्रकरणी संकल्प आमोणकरांचे पंतप्रधानांना पत्र

केंद्रीय महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांचे एक बेकायदेशीर रेस्टॉरंट अँड बार गोव्यात सुरू असून, या प्रकरणाची चौकशी योग्य प्रकारे व कोणत्याही दडपणाशिवाय व्हावी, यासाठी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात यावा, अशी मागणी करणारे एक पत्र कॉंग्रेसचे आमदार संकल्प आमोणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

आसगाव येथील सिली सोल्स रेस्टॉरंट अँड बार हे बेकायदेशीर असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी आहे. यासंबंधी माहिती हक्क कार्यकर्ते ऍड्. आयरिश रॉड्रिग्ज यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विविध सरकारी खात्यांनी चौकशीचे काम हाती घेतले आहे.

स्मृती इराणी यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात यावा. त्याशिवाय या प्रकरणी योग्य प्रकारे व कोणत्याही दडपणाशिवाय चौकशी होऊ शकणार नाही. या प्रकरणी अबकारी खाते, नगर नियाजन खाते, स्थानिक पंचायत, जीएसटी आदींद्वारे योग्य ती चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे स्मृती इराणी यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याशिवाय ते शक्य नाही, असेही आमोणकर यांनी पत्रात म्हटले आहे.

गोव्यातील महिला व बालविकास खात्याचे मंत्री विश्‍वजीत राणे यांनी नुकतेच स्मृती इराणी या आपल्या बॉस असून, त्यामुळे आपण सदरप्रश्‍नी काहीही बोलू शकत नसल्याचे मत व्यक्त केले असल्याचे आमोणकर यांनी पत्राद्वारे मोदी यांच्या नजरेस आणून दिले आहे.

राणे हे नगर नियोजन खात्याचे मंत्री असून, ते इराणी यांच्या रेस्टॉरंटवर कारवाईस चालढकल करत असतील, तर अन्य सरकारी अधिकारी कशी काय कारवाई करू शकतील, असा प्रश्‍नही आमोणकर यांनी उपस्थित केला आहे.