निवृत्त न्यायाधीशांमार्फत सरकारी नोकरी घोटाळ्याची चौकशी करा

0
7

>> आम आदमी पक्षाची राज्य सरकारकडे मागणी; मेरशी येथे जोरदार निदर्शने

राज्यात दररोज उघडकीस येणाऱ्या नवनव्या सरकारी नोकरी फसवणूक प्रकरणांच्या निषेधार्थ काल आम आदमी पक्षाने मेरशी सर्कल येथे निदर्शने केली. सरकारी नोकरी घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील समितीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी आम आदमी पक्षाकडून करण्यात आली. राज्यातील सरकारी नोकरभरती घोटाळ्यामध्ये बडे व्यक्ती गुंतलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी याप्रसंगी बोलताना केली.

सरकारी नोकरभरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि अनियमितता नष्ट करण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या नोकरी घोटाळ्याच्या तपासाच्या सद्य:स्थितीबाबत सार्वजनिक विधान करावे आणि तपासात पारदर्शकता आणावी, अशी मागणी देखील ॲड. अमित पालेकर यांनी केली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींचे वर्षभरातील कॉल रेकॉर्ड आणि टॉवर लोकेशन जाहीर करावेत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर येऊ शकते, असेही पालेकर म्हणाले.

सरकारी नोकरी घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग असल्याचा आरोप आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी केला. त्यामुळे या घोटाळ्याचा तपास संथगतीने केला जात आहे. राज्यातील हुशार, सुशिक्षित तरुणांना नोकरीसाठी लाच देणे परवडत नसल्याने त्यांना नोकऱ्या मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे देण्याची ही प्रथा अनेक पात्र उमेदवारांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचे मुख्य कारण आहे, असेही ॲड. पालेकर म्हणाले.
राज्यात सरकारी नोकरीच्या दलालीबाबत आणखी एक ऑडिओ क्लीप आमच्या हाती लागली आहे. ज्यात दक्षिण गोव्यातील एक नेता या प्रकरणामध्ये गुंतल्याचे स्पष्ट होत आहे. या नेत्यांनी तब्बल 40 ते 50 लाख रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप ॲड. पालेकर यांनी केला.
पोलीस खात्यातील उपअधीक्षक पदाच्या नोकरीसाठी इच्छुकाकडे 1.5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षकपदासाठी 35-40 लाख रुपयांची मागणी केली जात आहे. कारकून पदासाठी 20 ते 25 लाख रुपयांची मागणी केली जात आहे, असा आरोप आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी केला.

सरकारी नोकरीसाठी पैसे उकळण्याचा प्रकार गंभीर स्वरूपाचा असून, या प्रकरणी सखोल चौकशीची गरज आहे, असे आपचे वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी सांगितले.

सरकारी नोकरी घोटाळ्यामुळे अनेक होतकरू युवकांना नोकरीला मुकावे लागले आहे. यापूर्वी आम्ही केवळ ऐकायचो की पैसे देऊन सरकारी नोकरी मिळत आहे. आता, एक-एक करून हे सर्व प्रकार लोकांसमोर येऊ लागले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, दररोज अनेक तक्रारी दाखल होत आहेत, असेही सिल्वा यांनी सांगितले.

अमित पालेकर काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांनी तपासाची सद्य:स्थिती सर्वांसमोर आणावी.
अटक केलेल्या व्यक्तींचे वर्षभरातील कॉल रेकॉर्ड आणि टॉवर लोकेशन जाहीर करावेत.
सरकारी नोकरी घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग असल्याचा आरोप.
दक्षिण गोव्यातील एक नेता नोकरी घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप; एक ऑडिओ क्लीप आपच्या हाती.
पोलीस खात्यातील उपअधीक्षक पदाच्या नोकरीसाठी इच्छुकाकडे 1.5 कोटींची मागणी
पोलीस उपनिरीक्षकपदासाठी 35-40 लाख रुपयांची मागणी, तर कारकून पदासाठी 20 ते 25 लाख रुपयांची मागणी.