निवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवावाढीस सरकारी कर्मचारी संघटनेचा विरोध

0
18

गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सेवेत वाढ देण्यास विरोध दर्शविला असून राज्य सरकारने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सेवावाढ देणे बंद करावे. अन्यथा, सेवावाढीच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा काल गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभय मांद्रेकर यांनी संघटनेच्या कार्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेद्वारे दिला.
राज्य सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून सेवा निवृत्त अधिकाऱ्यांना सेवावाढ देण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे, असा दावा संघटनेचे अध्यक्ष मांद्रेकर यांनी केला.

राज्य सरकारकडून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवावाढीच्या विरोधात सरकारी कर्मचारी संघटनेने आंदोलन केले होते. त्यामुळे सेवावाढीचे प्रकार कमी झाले होते. आता, पुन्हा एकदा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सेवावाढ देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना आणखी सेवावाढ देऊ नये. बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी अध्यक्ष मांद्रेकर यांनी केली.

सेवावाढ घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांचा विचार करण्याची गरज आहे. दुसऱ्यावर अन्याय करून सेवावाढ घेऊ नये. सरकारला ते अधिकारी हवे असल्यास त्यांची ओएसडी म्हणून खास नियुक्ती करून घ्यावी. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सेवावाढ प्रश्नी एक निवेदन सादर केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे समीर नागवेकर व इतरांची उपस्थिती होती.