निवडणूक रोख्यांमुळे भाजपच सर्वाधिक मालामाल

0
10

>> टॉप दहा देणगीदारांकडून 35 टक्के निधीची खैरात; मेघा इंजिनिअरिंगकडून मिळाले सर्वाधिक 584 कोटी

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने गुरुवारी निवडणूक रोख्यांसदर्भातील माहिती जाहीर केली. त्यानुसार, भाजपला देणगी देणाऱ्या 487 कंपन्यांपैकी टॉप 10 कंपन्यांनी 2119 कोटी रुपये दिले आहेत. ही रक्कम एप्रिल 2019 पासून मिळालेल्या पक्षाच्या एकूण 6060 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांच्या 35 टक्के आहे.

राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्या फ्युचर गेमिंगने 1368 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले आहेत. यापैकी, भाजपला 100 कोटी, काँग्रेसला 50 कोटी, द्रमुकला 509 कोटी, वायएसआर काँग्रसेला 160 कोटी दिले आहेत. दानवीरांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या मेघा इंजिनिअरिंग ग्रुपने एकूण 1 हजार 192 कोटींचे रोखे खरेदी केले असून, भाजपला 584 कोटी आणि काँग्रेसला 110 कोटींचे वाटप केले आहे.

एमकेजे समूहाच्या चार कंपन्यांनी एकूण 617 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले असून, ते तिसऱ्या क्रमांकाचे मोठे देणगीदार आहेत. या रोख्यातून भाजपला 372 कोटी रुपये, काँग्रेसला 161 कोटी, तृणमूल काँग्रेसला 47 कोटी रुपये मिळाले आहेत.
आरपीएसजीच्या आठ कंपन्यांनी 584 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले, ज्यामुळे ते चौथ्या क्रमांकाचे देणगीदार बनले. समूहाच्या चार प्रमुख देणगीदार कंपन्यांनी – हल्दिया एनर्जी (377 कोटी), धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर (115 कोटी), फिलिप्स कार्बन (35 कोटी) आणि क्रेसेंट पॉवर (34 कोटी) यांनी मिळून 561 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. यामध्ये तृणमूलला 419 कोटी रुपये, भाजपला 126 कोटी आणि काँग्रेसला 15 कोटी रुपये मिळाले आहेत.

आदित्य बिर्ला समूह हा एकूण 553 कोटी रुपयांच्या रोखे खरेदी मूल्यासह पाचवा सर्वात मोठा देणगीदार आहे. समूहाच्या प्रमुख तीन देणगीदार कंपन्या – एस्सेल मायनिंग (225 कोटी), उत्कल अल्युमिना इंटरनॅशनल (145 कोटी) आणि बिर्ला कार्बन (105 कोटी) यांनी 475 कोटी रुपयांचे रोखे दिले. यापैकी 245 कोटी रुपये बीजेडीकडे आणि 230 कोटी रुपये भाजपकडे गेले.
या यादीत पुढे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सहयोगी कंपनी क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेडने रोख्यांवर 410 कोटी रुपये खर्च केले. यामध्ये भाजपला 375 कोटी आणि शिवसेनेला 25 कोटी रुपये मिळाले आहेत.

वेदांत लिमिटेडने 401 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले असून, 227 कोटी रुपयांसह भाजप सर्वाधिक लाभार्थी आहे. काँग्रेस आणि बीजेडीला अनुक्रमे 125 कोटी आणि 40 कोटी रुपये मिळाले आहेत. भारती समूहाच्या चार कंपन्यांनी 247 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. भारती एअरटेल लिमिटेडने रोख्यांवर 183 कोटी रुपये खर्च केले. त्यात भाजपला 197 कोटी रुपये मिळाले आहेत.
जिंदालच्या चार कंपन्यांनी 192 कोटी रुपयांचे रोखे विकत घेतले. जिंदाल स्टील अँड पॉवर या सर्वात मोठ्या खरेदीदाराने 123 कोटी रुपये खर्च केले. बीजेडीला 100 कोटी रुपयांचा सिंहाचा वाटा मिळाला, तर काँग्रेस आणि भाजपला अनुक्रमे 20 कोटी आणि 3 कोटी रुपयांचे रोखे मिळाले.
अहमदाबाद स्थित टोरेंट समूह हा दहाव्या क्रमांकाचा देणगीदार आहे. या तीन कंपन्यांद्वारे 184 कोटी रुपयांची देणगी दिली गेली. त्यातील भाजपला 107 कोटी रुपये मिळाले.