निवडणूक आयोगाकडून प्रचारावरील निर्बंध शिथिल

0
11

>> जाहीर प्रचार सभांस १००० लोकांना मान्यता

भारतीय निवडणूक आयोगाने काल विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार्‍या राज्यांना सार्वजनिक सभा घेण्यासाठी तसेच मतदारांच्या घरोघरी जाऊन केल्या जाणार्‍या प्रचारासाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर आयोगाने निवडणूक प्रचारावर घातलेले निर्बंध काल काही प्रमाणात शिथिल करताना जाहीर सभांसाठी केवळ ५०० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा शिथिल केली असून ती १००० एवढी केली. बंद सभागृहात घेतल्या जाणार असलेल्या सभांसाठीची मर्यादा ही ३०० वरून आता ५०० लोक अशी वाढवून दिली आहे.

घरोघरी प्रचारासाठी जाणार्‍यांसाठी जी १० लोकांची मर्यादा होती ती आता वाढवून २० एवढी करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक सोडून २० लोक असे नमूद करण्यात आले आहे.

रॅली व रोड शोवरील बंदी
११ फेब्रुवारीपर्यंत कायम

निवडणूक आयोगाने पाच राज्यांमध्ये रॅली आणि रोड शोवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवली आहे. पाच राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुक आयोगाने प्रथम १५ जानेवारी, नंतर २२ जानेवारी, नंतर ३१ जानेवारीपर्यंत रॅली, रोड शोवर बंदी घातली होती. दि. ११ फेब्रुवारीला पुन्हा कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहे.