महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना लाच स्वीकारण्याची लालूच दाखवल्याच्या आरोपावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर नोटीस बजावली आहे.
गडकरी यांनी वरील आशयाचे वक्तव्य केले असल्याने आदर्श निवडणूक आचार संहितेचा प्रथमदर्शनी भंग झाल्याचे दिसत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. येत्या बुधवारपर्यंत नोटिशीला उत्तर देण्याचे गडकरी यांना बजावण्यात आले आहे. या मुदतीत त्यांच्याकडून उत्तर न आल्यास निवडणूक आयोग आपला निर्णय घेईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघातील प्रचारसभेत बोलताना गडकरी यांनी कोणी लाच देऊ केल्यास मतदारांनी ती घ्यावी व नंतर मतदान कसे करावे ते ठरवावे असे म्हटल्याचा आरोप आहे. लक्ष्मीला नाकारू नका असेही त्यांनी म्हटल्याचा आरोप आहे. गडकरी यांची वक्तव्ये लाचखोरीला उत्तेजन देणारी असल्याची टिपणी निवडणूक यांनी केली आहे