केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश
केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या एका आदेशाद्वारे दि. १३ रोजी होणार्या पणजी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी संपूर्ण उत्तर गोव्यासाठी लागू केलेली आचारसंहिता शिथिल करण्यात आली असून ती पणजी मतदार संघापुरती मर्यादित करण्यात आली आहे. वरील आदेशाद्वारे पणजी मतदारसंघ वगळता उत्तर गोव्यातील अन्य सर्व भागातील विकास कामे करण्यास तसेच निविदा जारी करणे तसेच अधिकार्यांच्या बदल्या करण्यास मान्यता दिली आहे. खासदार निधी योजनेखालील प्रकल्पांचे कामही चालू ठेवण्यास मान्यता दिली आहे. पणजी मतदारसंघात नवे प्रकल्प सुरू किंवा आर्थिक संबंध असलेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यास बंदी घातली आहे. मंत्र्यांचे दौरे किंवा जाहिराती वितरित करण्याचे झाल्यास आयोगाची मान्यता घ्यावी लागेल. निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकार्यांच्या किंवा कर्मचार्यांच्या बदल्या करण्याचे झाल्यास आयोगाची मान्यता घेणे सक्तीचे असल्याचे आदेशात म्हटले आहे.
दि. १३ रोजीची पोटनिवडणूक झाल्यानंतर राज्यात जिल्हा पंचायतीची निवडणूक होणार असल्याने त्यावेळीही आचारसंहिता लागू असेल. त्याचा राज्याच्या विकास कामांवर परिणाम होणार होता. मार्च नंतर पावसाळ्यापूर्वीची कामेही महत्वाची असतात. या सर्व बाबींचा विचार करून निवडणूक आयोगाच्या येथील कार्यालयाने पणजी वगळता अन्य भागातील आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली होती. आयोगाच्या वरील निर्णयामुळे सरकारला तसेच जनतेलाही दिलासा मिळाला आहे. वेगवेगळ्या भागातील संरक्षण भिंती तसेच अन्य विकास प्रकल्पांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु आचारसंहितेमुळे कामाचे आदेश अडकले होते.